पावसाचा जोर २६ जुलैनंतर वाढणार, कोकणात अतिवृष्टीचा इशारा

 मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात २६ जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.  

Updated: Jul 23, 2019, 11:21 PM IST
पावसाचा जोर २६ जुलैनंतर वाढणार, कोकणात अतिवृष्टीचा इशारा title=
संग्रहित छाया

पुणे : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात २६ जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. दरम्यान, कोकण आणि गोव्यात पुढील चार ते पाच दिवसात अतिवृष्टी होईल. तसेच तर येत्या ४८ तासात मुंबईतील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेने दिला आहे. रत्नागिरी गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे.

रत्नागिरीला झोडपले

विजांच्या कडकडाटासह दक्षिण रत्नागिरीसह गुहागर, लांजा, राजापूर, दापोलीमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे दक्षिण रत्नागिरीतले जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजापूर तालुक्यात सर्वाधिक, तब्बल २५१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. रत्नागिरी तालुक्यात २१२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरीच्या बाजारपेठांमध्ये पाणी साचलं होतं. मिरजोळे पाटीलवाडी इथं पुलावरून पाणी गेल्याने १६ गावांचा संपर्क तुटला होता. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.  

रत्नागिरीत पावसाचा धुमाकूळ सुरुच आहे. पावसाचा सर्वाधिक फटका मालगुंड परिसराला बसलाय. घरात पाणी घुसल्यानं जवळपास लाखो रुपयांचं नुकसान झालंय.  खाडीचं पाणी पात्राबाहेर आल्यानं पाणी घरात शिरलं.  यामुळे येथे राहणाऱ्या कुटुंबीयांना रात्रभर पाण्यात राहावं लागलं. 

लातूरमध्ये समाधानकारक पाऊस व्हावा यासाठी वडवळ नागनाथ येथील महिलांनी शिवलिंगाला पाण्यात कोंडून ठेवलं. यावेळी महिलांनी ओम नम: शिवाय असा गजर केला आणि घागरीने आणलेले पाणी शिवलिंगावर ओतत जलाभिषेक केला. पाऊस पडून दुष्काळ दूर व्हावा अशी प्रार्थना महिलांनी केली.

कृत्रिम पावसाचा प्रयोग फसला

दरम्यान, पावसाने पाठ फिरवल्यामुळे सरकारने कृत्रीम पावसाचा प्रयोग करायचे ठरवले खरे. मात्र सोलापुरात कृत्रिम पावसाचा या मोसमातला पहिलाच प्रयोग फसला आहे. राज्य सरकारनं कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी केली. पण ढगांनी या प्रयोगाला खो घातलाय. विमान आकाशात पाऊस पडण्यासाठी उडालं. पण ढगांमध्ये बाप्षच नव्हतं. त्यामुळं विमानाला रिकाम्या हातानं परत जमिनीवर यावं लागले. विमानाने तब्बल दोनशे किलोमीटर घिरट्या घालूनही पाऊस पाडण्यासाठी पोषक ढग न आढळल्यामुळे हा प्रयोग थांबवण्यात आलाय. त्यामुळे सोलापूरकरांचा हिरमोड झाला आहे. गेल्या आठवडाभर चर्चेत असलेला कृत्रिम पाऊस पडण्याच्या प्रयोगाला दुपारी दोन वाजता सुरुवात झाली. चार विमानं सोलापूरच्या विमानतळावर तैनात करण्यात आले. त्यातील एका विमानानं आज या प्रयोगाच्या तपासणीसाठी उड्डाण केलं. मात्र दोनशे किलोमीटर परिसरात घिरट्या घालूनही पावसासाठी अनुकूल वातावरण नसल्यामुळे अपयश आले.