निलेश वाघ, वणी : राज्यातील देवींच्या साडेतीन पिठापैकी अर्धपीठ असलेल्या नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावर ढगफुटी सारखा पाऊस झाला. यावेळी मंदिरातून परतीच्या मार्गावरील पायऱ्यावर पूर स्थिती निर्माण होऊन सहा भाविक जखमी झाले. जखमींमध्ये दोन महिला व दोन लहान मुलांचा समावेश आहे. गडावरील स्थानिक तसेच आपत्ती व्यवस्थापन समितीच्या पथकाने जखमींना सुखरूप खाली आणले.
अशी घडली घटना....
गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास सप्तशृंगी गडावर ढगफुटीसारखा पाऊस बरसला. त्यामुळे डोंगरावरून येणाऱ्या पावसाचा जोर अचानक वाढला. मंदिरातून खाली येणाऱ्या पायऱ्यांच्या संरक्षण भिंतीवरून पावसाचे पाणी पायऱ्यांवर आले. दगड, मातीसह झाडेही वाहून आली. याचवेळी देवीचे दर्शन घेऊन खाली उतरणारे भाविक अचानक आलेल्या पूरासारख्या पाण्यात अडकले, आणि पायऱ्यांवरून गडबडून खाली घरंगळत गेले. यात निबाबाई नानु नाईक (वय 45 रा एरंडोल) , अशिष तांरगे (वय 23 रा. नागपुर ), मनिष राऊत (वय 32 रा नागपुर ), पल्लवी नाईक (वय 3 रा एरंडोल),शैला आव्हाड (वय 7 ) हे जखमी झाले.
तातडीने मदत
भाविक अडकल्याचे लक्षात येताच सप्तशृंगी गडावरील स्थानिक नागरिक तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीम भाविकांना सुरक्षित खाली आणले. देवी संस्थानच्या दवाखान्यात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान प्रदक्षिणा मार्ग खचला आहे, तसेच अतिवृष्टी सदृश परिस्थिती असल्याने भाविकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले.