शशिकांत पाटील, झी मीडिया लातूर : तब्बल ४५ दिवसांनंतर लातूरमध्ये पावसानचं पुनरागमन झालं. १९ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात सर्वत्र पावसानं जोरदार सुरुवात केली. अनेक भागात तर अतिवृष्टी झाली. नागझरी सह परिरसातील काही भागाला वादळी वाऱ्याचाही तडाखा बसला. त्यामुळे शेतात उभा असलेला ८ ते १० फुटी ऊस आडवा झालाय.
काही ठिकाणी ज्वारीच्या उभ्या पिकांचीही अशीच अवस्था आहे. आडवा झालेला ऊस साखर कारखाना घेणार नाही. त्यामुळे करायचं काय असा प्रश्न शेतक-याला पडलाय.
भाजपचे खासदार सुनील गायकवाड यांनी अतिवृष्टी आणि वादळामुळे आडव्या झालेल्या पिकांची पाहणी केली. या शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून सरकार दरबारी प्रयत्न करु असं आश्वासन त्यांनी दिलंय. नुकसानग्रस्त शेतक-यांना नियमाप्रमाणे मदत देऊ असं लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही स्पष्ट केलंय.
मदतीचं आश्वासन मिळालं असलं तरी आडव्या झालेल्या उसाचे पंचनामे कधी होणार आणि मदत कधी मिळणार हा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे. मात्र नैसर्गिक संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आशा आहे ती सरकारच्या मदतीची.