बीड : बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील शनी मंदिरात पुराचं पाणी आलंय. मंदिरातील गाभा-यात पाणी आलं आहे. गेवराई तालुक्यातही संततधार आहे. गोदावरी नदीला पूर आला आहे. जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस झालाय. अनेक ठिकाणी नद्या-नाल्यांना पूर आला.
महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसानं बीड जिल्ह्यात सगळीकडे दमदार हजेरी लावलीय. कधी नव्हे तो हवामान खात्याचा अंदाज खरा ठरल्याचं सर्वांच्याच तोंडून ऐकायला मिळतंय. या पावसामुळे माना टाकेलल्या पिकांना जीवदान मिळणार आहे. पोळा एक दिवसावर आला असताना पावसानं दमदार हजेरी लावून शेतक-यांना सुखद धक्का दिलाय, त्यामुळं बळीराजा आनंदीत झालाय.
एका रात्रीच्या या पावसानं सारं चित्रच बदलेलं दिसतंय. जिल्ह्यातल्या ३५ महसूल मंडळात अतिवृष्टी झालीय. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचलंय. ग्रामीण भागातलं जनजीवन विस्कळीत झालंय. गोदावरी, कृष्णा खो-या अंतर्गतच्या लघु, मध्यम प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ झालीय. नदी नाले तुडुंब भरून वाहतायत.
वार्षिक सरासरीच्या तुलनेत 49.15 टक्के पावसाची जिल्ह्यात नोंद झालीय. बीडमध्ये 74.82 मिमी, पाटोदा 97.50 मिमी, गेवराई 69.20, धारूर 57 मिमी, अंबाजोगाई 75 मिमी परळीमध्ये 58.40 मिमी आणि केजमध्ये 65.86 मिमी पाऊस झालाय.