वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : जळगाव सेशन कोर्टात पुन्हा थरार पहायला मिळाला. पिस्तूलनंतर आता एक जण चाकू घेऊन कोर्टात शिरला. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. वेळीच हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्याने गुन्हेगारीचा मोठा कट उधळला आहे (Jalgone Crime News).
जळगाव शहरातील शिवाजी नगर येथील राकेश सपकाळे याला खून खटल्यातील संशयित आरोपींना जिल्हा न्यायालयात तारखेवर हजर करण्यात आले होते. या खुन खटल्यातील जामीनावरील संशयित आरोपी सोबत असलेल्या चंद्रकांत राजकुमार शर्मा तरुणाकडे चॉपर आढळून आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धडक कारवाई करीत संभाव्य धोका टाळण्यात यश मिळवले आहे.
राकेश सपकाळे खून खटल्यातील संशयित आरोपींना पोलिसांनी जिल्हा न्यायालयामध्ये तारखेवर हजर केले होते. या ठिकाणी संशयित आरोपींना भेटण्यासाठी काही तरुणांनी गर्दी केली होती. याच वेळेला एका तरुणाकडे धारदार शस्त्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तातडीने धाव घेत संबंधित तरुणावर कारवाई करण्यात यश मिळवले.
चंद्रकांत राजकुमार शर्मा या तरुणाकडे चॉपर आढळल्याने त्याला तात्काळ ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यालयात नेण्यात आले. त्याने हा चॉपर का आणला होता याची पोलिस चौकशी करत आहेत.
20 फ्रेब्रुवारी रोजी खूनाचा बदला घेण्यासाठी एक व्यक्ती बुरखा घालून पिस्तुल घेवून कोर्टात शिरला होता. भुसावळमध्ये लहान मुलांच्या भांडणातून 11 ऑक्टोबर 2020 रोजी कैफ शेख जाकीर या तरुणाच्या डोक्यात रॉड घालून त्याचा खून करण्यात आला होता. खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य संशयीत धम्मप्रिय मनोहर सुरडकर याला पोलिसांनी अटक करत कारागृहात रवानगी केली. पुढे एक वर्षाने म्हणजे 21 सप्टेंबर 2021 मध्ये त्याला न्यायलयाने जामीन मंजूर केला. जामिनावर सुटून 22 सप्टेंबर 2021 रोजी तो आणि वडील मनोहर आत्माराम सुरडकर दुचाकीने घरी जात होते. नशिराबाद इथं सूनसगाव इथल्या रस्त्यावर एका टपरीवर थांबले असताना तीन तरुणांनी दोघांवर हल्ला केला. धम्मप्रिय याच्यावर केलेल्या गोळीबारात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचे वडिल म्हणजे मनोहर सुरडकर जखमी झाले. धम्मप्रियच्या हत्येप्रकरणी नशिराबाद पोलिसांनी चौघांना अटक केली होती. त्यापैकी दोघे सध्या जामिनावर असून शेख शमीर उर्फ समीर उर्फ भांजा शेख जाकीर आणि रेहानुद्दीन उर्फ भांजा नईमोद्दीन या दोघांची सुनावणी सुरू आहे. सोमवारी दुपारी 2 वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार होतं. आपल्या मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांवर न्यायालयातच गोळीबार करून त्यांचा खून करण्याचा डाव धम्मप्रिय याचे वडील मनोहर यांनी रचला होता.