Gulabrao Patil Warne Bjp : प्रेमात, युद्धात आणि राजकारणात सगळं माफ असतं, असं म्हणतात. जळगावमधल्या (Jalgoan News) महायुतीच्या सभेत पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटलांनी तुफान फटकेबाजी करताना हेच तर विस्कटून सांगितलं. विधानसभेला एकमेकांच्या विरोधात लढणारे नेते लोकसभेला एकत्र आलेत. राजकारणातल्या या लव्ह-हेट रिलेशनशीपवरच गुलाबरावांनी (Gulabrao Patil) गुलाबी टोला लगावला. राजकारणात दुश्मन के दुश्मन दोस्त हो जाते है, असं गुलाबरावांनी भाषणात सांगितलं. मात्र त्याचवेळी भाजपच्या नेत्यांना अप्रत्यक्ष इशाराही दिला. लोकसभेला आम्ही मदत करतोय, विधानसभेला तुम्ही मदत केली नाही तर लक्षात ठेवा, असंही त्यांनी बजावलं.
गुलाबरावांच्या या हटके भाषणाची सध्या जोरदार चर्चा आहे. दरम्यान, विधानसभेलाही महायुतीचं जागावाटप गोडीगुलाबीनं पार पडेल, असं उद्योगमंत्री उदय सामंतांनी सांगितलं. केवळ जळगावच नाही, तर अख्ख्या महाराष्ट्रात सध्या असेच राजकीय प्रेमसंबंध जुळून आलेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना शिंदे गट आणि भाजपचं अफेअर घट्ट झालंय. या दोघांमध्ये राष्ट्रवादीच्या निमित्तानं तिसरा भिडूही सामील झालाय. आता विधानसभा निवडणुकीत महायुतीवाल्यांचं हे अफेअर टिकतं की, लव्ह यूवरून प्रकरण पुन्हा हेट यूवर जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट अशी खिचडी पहायला मिळतेय. तर दुसरीकडे भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट असं समिकरण आहे. लोकसभेच्या तिकीट वाटपाला पक्षश्रेष्ठींना अनेकांची मनधरणी करावी लागली होती. काही नेत्यांना विधानसभेला तिकीट देऊ म्हणून बंड शांत झालं खरं पण आता विधानसभेला तिकीट देताना खरा कस लागणार आहे.
दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसवर निशाणा लगावला होता. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत, असं पाकिस्तान आणि काँग्रेसला वाटतं. विरोधी इंडिया आघाडीत पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणारे ‘मुंगेरीलाल’ अधिक आहेत, असा टोला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला होता. त्यावेळी त्यांनी संजय राऊतांवर देखील टीका केली होती. संजय राऊतांनी पक्षाचा सत्यानाश केला, असा आरोप देखील गुलाबरावांनी केलाय.