GramPanchayat Election Result : राजकीय पक्षांचे दावे किती खरे ? किती खोटे ?

राजकीय पक्षांचे हे दावे हवेतील 

Updated: Jan 19, 2021, 03:54 PM IST
GramPanchayat Election Result : राजकीय पक्षांचे दावे किती खरे ? किती खोटे ? title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष आपण आघाडी घेतल्याचा दावा करत आहेत. मात्र राजकीय पक्षांचे हे दावे हवेतील आहेत.राज्यातील ६ हजार ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता येईल असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय. ४ हजारहून अधिक ग्रामपंचायतीत बहुमत मिळाल्याचं कॉंग्रेसने म्हटलंय. शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारत ३११३ जागी दणक्यात विजय मिळवल्याचं सांगितलं तर ग्रामपंचायत निवडणुकीत एक नंबरचा पक्ष असल्याचं राष्ट्रवादीनं म्हटलंय.

राजकीय पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकीबाबत केलेले हे दावे. याशिवाय इतर लहान पक्षांनीही वेगवेगळे दावे केले आहेत. राज्यात १४,२३४ ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. यातील काही ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या आणि उर्वरित ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदान झालं. 

निवडणूक निकालानंतर मग सर्व राजकीय पक्षांनी दावे, प्रतिदावे सुरू केले. मात्र सर्व पक्षांनी केलेल्या दाव्यांचा बेरीज केली तर ती निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींच्या संख्येपेक्षा जास्त होते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीतील कोणत्या पक्षांचा दावा खरा हा प्रश्न पडतो.
 
एक तर 
- ग्रामपंचायत निवडणूक कुठल्याही पक्षाच्या चिन्हांवर लढवली जात नाही
- स्थानिक आघाड्या, पॅनल करून ही निवडणूक लढवली जाते
- कोणत्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर ग्रामपंचायत निवडणूक लढवली जात नाही 
- अनेक ठिकाणी यात सर्व पक्षीय कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा समावेश असतो
- निवडून आलेली ग्रामपंचायत अनेकदा सर्व पक्षांना आम्ही तुमच्याच पक्षाचे सांगत असतात
- यातून सर्व पक्षांकडून गावासाठी मदत मिळेल ही अपेक्षा असते

या सगळ्या बाबी लक्षात घेता ग्रामपंचायत निवडणुकीतील राजकीय पक्षांचे दावे लोकांना गोंधळात टाकणारे आहेत. मात्र आपल्या पक्षाचे वर्चस्व असल्याचा दावा करून पक्षात चैतन्य निर्माण करण्याचं हे पक्ष करत असतात. मात्र प्रत्यक्ष ग्रामपंचायतीचे आकडे आणि केले जाणारे दावे बघितले तर यातून लोकांचं मनोरंजनच होतंय हे खरं..