जळगाव: दुधाचे भाव पडण्यापेक्षा सरकारने एकतर ग्राहकाला अनुदान द्यावं किंवा उत्पादकांना भाववाढ करून द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. उत्पादकाला प्रतिलिटर दुधामागे २८ ते ३० रुपये लिटर उत्पादन खर्च लागतोय आणि शासन दुधाला अवघा १७ ते १८ रुपये प्रतिलिटर भाव देतंय हे शेतकऱ्यांचं शोषण असल्याची टीका शेट्टी यांनी केलीय. भेसळ माफियांवर सरकारने कारवाई केली तर अतिरिक्त दुधाचा प्रश्न उरणार नाही असंही राजू शेट्टी यावेळी म्हणाले.
विधान परिषद निवडणुकीत शिवसेना पुन्हा भाजपसोबत एकत्र आली असली तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेनेची भूमिका काय असेल हे पाहायला थोडा अवधी द्यावा लागेल सेनेची भूमिका बदलली तर आमची सरकारची विरोधातली लढाई थांबणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे.
गायीच्या दुधाला हमीभाव मिळावा यासाठी कोल्हापुरात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत दूध वाटप करत सरकारचा निषेध नोंदवला. पाण्याच्या बॉटल इतकाही दर दुधाला नसल्याने दर द्या नाहीतर फुकट घ्या असा संताप यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना मोफत दुध वाटप केलं.
दरम्यान, आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर शेतकऱ्यांनी दणाणून सोडला. यावेळी आंदोलकांनी गायीच्या दुधाला प्रति लिटर ४० रुपये तर म्हशीच्या दुधाला ६० रुपये दर द्यावा.अशी मागणी केलीय. दरम्यान जागतिक बाजारपेठेतील स्थिती आणि दूध संघांची स्थिती,पाहता २७ रुपये दूध दर देणे सध्यस्थीतीत शक्यच नसल्याच, गोकुळचे संचालक अरुणकुमार डोंगळे यांनी स्पष्ट केलं.