आषाडी वारीबाबत शासनाची नियमावली जाहीर, केवळ दीड कि.मी.पायी वारी करता येणार

यंदाची आषाढी वारी पायी चालत करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी वारकरी आणि महाराज मंडळींकडून करण्यात येत होती. पण कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारनं यंदाही वारीबाबत काही निर्बंध कायम ठेवले आहेत.

Updated: Jun 14, 2021, 08:11 PM IST
आषाडी वारीबाबत शासनाची नियमावली जाहीर, केवळ दीड कि.मी.पायी वारी करता येणार title=

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात निर्बंध लावण्यात आले आहेत. या  पार्श्वभूमीवर यंदाच्या आषाढी वारीसाठीही शासनाने नियमावली जाहीर केली आहे. यंदाच्या आषाढी वारीसाठी मानाच्या 10 पालख्यांना परवानगी देण्यात आली असून प्रस्थान ठिकाणापासून एसटी बसमधून वाखरीपर्यंत प्रवास करता येणार आहे. तर  वाखरीपासून दीड किलोमीटर अंतर पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना पायी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

यंदाची आषाढी वारी पायी चालत करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी वारकरी आणि महाराज मंडळींकडून करण्यात येत होती. पण कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारनं यंदाही वारीबाबत काही निर्बंध कायम ठेवले आहेत. यासंदर्भात सरकारकडून एक आदेश जारी करण्यात आलाय.

देहू आणि आळंदी इथल्या प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी 100 तर उर्वरीत आठ सोहळ्यांसाठी प्रत्येकी 50 वारकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. 

यावर्षी सर्व मानाच्या पालखी सोहळ्यांचे पंढरपूरमध्ये दशमीच्या दिवशी आगमन होईल तर पौर्णिमेच्या दिवशी प्रस्थान करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

संताच्या पादुका भेटीदरम्यान मानाच्या पालखी सोहळ्यातील 40 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. वारीसाठीच्या 2 बसमध्ये प्रत्येकी 20 असे 40 वारकऱ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. 

विठ्ठल-रुख्मिणीची शासकीय महापूजाही गेल्या वर्षीप्रमाणे नियम पाळूनच होणार आहे. तर नित्योपचार परंपरेनुसार सुरु ठेवून आषाढी यात्रा कालावधीत भाविकांसाठी दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. 

एकादशी दिवशीचा रथोत्सवासाठी रथाऐवजी मंदिराच्या स्वतंत्र वाहनाने 10 मानकरी आणि मंदिर समितीचे 5 कर्मचारी अशा एकूण 15 व्यक्तींना योग्य ती खबरदारी घेऊन सोहळा साध्यापद्धतीने साजरा करण्यास परवानगी देण्यात आली आहे.