मोठी बातमी । एसटी कर्मचाऱ्यांना नवीन वेतनवाढ लागू

 MSRTC Strike : एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने गुडन्यूज दिली आहे. (Good news to ST employees)  

Updated: Dec 2, 2021, 03:23 PM IST
मोठी बातमी । एसटी कर्मचाऱ्यांना नवीन वेतनवाढ लागू title=

मुंबई : MSRTC Strike : एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने गुडन्यूज दिली आहे. (Good news to ST employees) एसटी कर्मचाऱ्यांना नवीन वेतनवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचे वेतन हे नवीन वेतनवाढीनुसार मिळणार आहे. ( New pay hike for ST employees)

एसटी कर्मचाऱ्यांना ही नवीन वेतनवाढ लागू नोव्हेंबर महिन्यापासून देण्यात येणार आहे. तसा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. याबाबतचे परिपत्रकच महामंडळाने जारी केले आहे. नवनियुक्त ते दहा वर्ष कालावधी झालेल्या कर्मचाऱ्यांना 5 हजार रुपये वाढ मिळणार आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन हे दर महिन्याच्या सात तारखेला होते. जे कर्मचारी कर्तव्यावर आहेत, त्यांनाच नवीन वेतनवाढ मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

काही एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप सुरुच आहे. संपावर गेलेले काही कर्मचारी सरकारच्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर कामावर रुजू झाले आहेत. जे कर्मचारी कामावर रुजू झालेत, त्यांचे निलंबन मागे घेण्यात येणार आहे. मात्र, अद्याप काही आगारातील कर्मचाऱ्यांनी संपावर ठाम आहेत. राज्य सरकारमध्ये कर्मचाऱ्यांचे विलिनीकरण करण्यात यावे, अशी त्यांची मागणी आहे. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

महामंडळाने काढलेल्या परिपत्रकात सुधारित वेतनवाढीनुसार नव्याने नियुक्ती मिळालेल्या आणि 10 वर्षांच्या  कर्मचाऱ्यांना 5 हजार रुपयांची वाढ केली आहे. 10 ते  20 वर्षांपर्यंतची सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना 4000 रुपयांची पगारवाढ, तसेच  20 वर्षांपेक्षा अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना 2 हजार 500 रुपये पगारवाढ दिल्याचे नमूद केले आहे.  तसेच  शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्त्यात वाढ  होणार आहे. 28 टक्के  महागाई भत्ताही देण्यात येणार आहे.

दरम्यान, एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याने संप सुरूच आहे. महामंडळात बुधवारी 92  हजार 266 पैकी फक्त 18 हजार 694 कर्मचारी कामावर  रुजू झाले आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी महामंडळाने सुधारित वेतनवाढीची माहिती कर्मचाऱ्यांना देण्यासाठी एक परिपत्रकच काढले आहे. 

दरम्यान, जे कर्मचारी कामावर रुजू झालेले नाहीत, त्या कर्मचाऱ्यांवर महामंडळाने  निलंबनाची कारवाई सुरूच ठेवली आहे. बुधवारी 448 कर्मचारी निलंबित केले. त्यामुळे एकूण निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या 8 हजार 643 झाली आहे. तसेच रोजंदारीवरील  65  कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त झाली. आतापर्यंत 1 हजार 892 कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई केली आहे.