Crime News : गोंदियाच्या सुर्यटोला जळीत कांडातील आरोपीला फाशीची शिक्षा, पहिल्यांदाच असं घडलं

Gondia kishor Shende Case : पत्नीला, सासऱ्याला आणि मुलाला जिवंत जाळ्याप्रकरणी गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी किशोर शेंडे याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

सौरभ तळेकर | Updated: May 9, 2024, 06:54 PM IST
Crime News : गोंदियाच्या सुर्यटोला जळीत कांडातील आरोपीला फाशीची शिक्षा, पहिल्यांदाच असं घडलं title=
Gondia District Sessions Court gives Capital Punishment to kishor Shende

Gondia Crime News : गोंदियाच्या सुर्यटोला जळीत कांडातील आरोपी किशोर शेंडे याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल दिला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतलेल्या आरोपी किशोर शेंडे याने मध्यरात्री सासरा, पत्नी आणि मुलाला जिवंत जाळले होते. मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. अशातच आता गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. गोंदिया जिल्हा सत्र न्यायायलयाने पहिल्यांदाच फाशीची शिक्षा सुनावल्याची घटना घडली आहे.

नेमकं काय झालं होतं?

गोंदिया शहराच्या सूर्याटोला भागात राहणारी महिला 14 फेब्रुवारी 2023 माहेरी आली असताना तिच्या पतीने सासरी येत पत्नी तसेच 5 वर्षीय मुलगा आणि सासर्‍याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळले होते. त्यानंतर पोलिसानी आरोपीला काही तासातच अटक केली होती. अशातच आज गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी किशोर शेंडे याला आज फाशीची शिक्षा सुनाविली आहे.

सदर घटना 14 फेब्रुवारी 2023 ला घडली होती. या प्रकरणी विविध सामाजिक संघटनांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. या संदर्भात कॅडल मार्च देखील काढण्यात आला होता. हे प्रकरण गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होते. अखेर या प्रकरणी आज 9 मे 2024 ला गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन. बी. लवटे यांनी आरोपीला फाशीची शिक्षा सुनाविली आहे. 

दरम्यान, हा निकाल कॉन्फरमेशनकरिता हायकोर्टात जाणार असून तिथून ही शिक्षा अंमलात येणार असल्याची माहिती वकील विजय कोल्हे यांनी दिली आहे. तर या प्रकरणाची गंभिर्यता पाहता या प्रकरणात सरकारी वकील म्हणून नागपूर कोर्टात काम करीत असलेले सरकारी वकील विजय कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली होती. या प्रकरणात आरोपीला शिक्षा सुनाविण्याकरिता महत्वाचे पुरावे घेत युक्तिवाद केल्याने आज हा निकाल मार्गी लागला. कोर्टाच्या निर्णयानंतर पिडीतांच्या कुटूंबियानी समाधान व्यक्त केलं आहे.