सोनू भिडे, नाशिक: ज्या हातांनी कधी खून, दरोडा, बलात्कार, चोरी केलीय तेच हात सध्या बाप्पाची मूर्ती तयार करत आहेत. फक्त गणपती बाप्पाच्या मूर्तीच नाही तर इतर गोष्टीही या ठिकाणी तयार केल्या जात आहेत. हे घडत आहे नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात.... चला तर जाणून घेऊया नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहाबद्दल....
राज्यात एकूण साठ कारागृह आहेत. यात नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहाचाहि समावेश आहे. या कारागृहात आजमितीस जवळपास तीन हजार कैदी आहेत. यात प्रत्येकाच्या हाहात वेगवेगळी कला आहे. या कैद्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळाव यासाठी वेगवेगळे वस्तू कारागृहात २०१७ पासून तयार करण्यास सुरवात करण्यात आली.
कारागृहात तयार केला जातोय बुद्धीचा देवता
कोकण येथील सागर पवार हा बंदी नाशिकच्या कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी आला होता. पेण गावात मूर्ती तयार करण्याचा पवार कुटुंबियांचा व्यवसाय आहे. सागर सुद्धा त्याच्या आई वडिलांना मूर्ती तयार करण्यासाठी मदत करायचा. सागरकडून गुन्हा घडला आणि त्याला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले.
यानंतर सागरने कारागृहात मूर्ती तयार करण्यास सुरवात केली. त्याच्या सोबत आडव असलेल्या काही कैद्यांनी त्याला मदत केली आणि तेही मूर्ती तयार करू लागले. सागरने कारागृहातील कैद्यांना मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. या वर्षी अकरा कैद्यांनी ५५० मुर्त्या तयार केल्या आहेत.
कारागृहात तयार केलेल्या मुर्त्या ह्या इकोफ्रेंडली आहेत. मूर्ती तयार करताना शाडूच्या मातीचा वापर केला जातो. मूर्तीला दिला जाणारा कलर वॉटर कलर असल्याने सहज पाण्यात विरघळतो. यामुळे प्रदूषण होत नाही. सर्वात लहान मूर्ती बारा इंच असून, सर्वात मोठी 28 इंच आहे. लालबागचा राजा, फेटा गणेश, वक्रतुंड गणेश, लंबोदर गणेश, दगडूशेठ गणेश, त्याचप्रमाणे लहान वक्रतुंड, मोठा वक्रतुंड, गजमुख लंबोदर, कमळ आदी प्रकारच्या गणेशमूर्ती कारागृहाच्या विक्री केंद्रावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मुर्त्यांची किमत ९०० रुपये पासून ते साडे चार हजार रुपयापर्यंत आहे. गेल्या पाच वर्षात बंदिनी तयार केलेल्या मूर्तींची मागणी वाढली आहे.
नाशिकच्या कारागृहात तयार होते पैठणी सोबत इतरही वस्तू
नाशिक मध्यवर्ती कारागृहात फक्त बाप्पाच्या मुर्त्या तयार होत नाही तर महिलांची आवडती पैठणी सुद्धा तयार केली जाते. या पैठणीला परराज्यातून मागणी आहे. पैठणीची किमत पाच हजारापासून पन्नास हजारापर्यंत आहे. यासोबत कारागृहात, टॉवेल, सतरंजी, देवाचे आसन, टेबल, खुर्ची, बसण्यासाठी छोटी टेबल्सचा समावेश आहे. तसेच पुरुषांसाठी मजबूत शूज तयार करण्यात येतात. अनेक जीवनावश्यक वस्तू कारागृहात तयार करण्यात येतात. या कैद्यांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीतून मिळणारा नफा हा कैद्यांना दिला जातो.