पुण्यातल्या गणेशोत्सवाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव, मिरवणुकीला चढणार रंग

पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाचं हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे यावर्षी विसर्जन मिरवणुकीला अधिकच रंग चढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन आणि पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. 

Updated: Sep 5, 2017, 09:39 AM IST
पुण्यातल्या गणेशोत्सवाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव, मिरवणुकीला चढणार रंग title=

पुणे : पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाचं हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे यावर्षी विसर्जन मिरवणुकीला अधिकच रंग चढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन आणि पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. 

पुण्यातल्या गणेशोत्सवाचा यावर्षी शतकोत्तर रौप्यमहोत्सव असल्यामुळे उत्साह काही औरच होता. तसाच उत्साह आता विसर्जन मिरवणुकीतही असणार आहे. त्यामुळे यावर्षी अनंत चतुर्दशीला कोणतंही विसर्जन निर्विघ्न पार पाडावं यासाठी प्रशासन आणि पोलिसांनी कसून तयारी केली आहे. पुण्यातील मानाच्या गणपतींचं याही वर्षी हौदांमध्ये विसर्जन होणार आहे. पुण्यातील गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे.

मुठा तीरावरील ५७ घाटांसह २५५ ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. सर्व ठिकाणी निर्माल्य कलश असणार आहेत. विसर्जन मार्ग तसंच विसर्जन घाटांवर अग्निशामक दल, जीवरक्षक, सुरक्षा रक्षक, रुग्णवाहिका तैनात असणार आहेत. सुमारे ४ लाख गणेश मूर्तीचं विसर्जन होईल असा अंदाज आहे. महापालिकेचे ३ हजार कर्मचारी तैनात असणार आहेत. सर्व स्थळांवर पर्यावरणपूरक विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. 

विसर्जन मिरवणुकीत यावर्षी जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पुणे पोलीस विशेष बंदोबस्त ठेवला आहे. वाहतुकीतही मोठे बदल करण्यात आले आहेत. 8500 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात आहेत. 500 स्वयंसेवक, महिला आणि वाहतूक पोलीसांची विशेष पथकं असणार आहेत.

गर्दीत साध्या वेषातील पोलीस तैनात असणार आहेत. 1250 सीसीटीव्ही बसवण्यात आलेत. पुण्यातले १७ रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचीही मदत घेतली जाईल. उत्सव निर्विघ्न पार पडण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाने कंबर कसली आहे. त्याला आता नागरिकांनीही साथ देण्याची आणि सहकार्य करण्याची गरज आहे.