व्यावसायिक स्पर्धा आणि नैसर्गिक संकटांमुळे पेणचे गणेश मूर्तीकार अडचणीत

पेणच्या गणपतींची ख्याती देशच नाही तर जगभरात आहे.

Updated: Aug 23, 2019, 02:52 PM IST
व्यावसायिक स्पर्धा आणि नैसर्गिक संकटांमुळे पेणचे गणेश मूर्तीकार अडचणीत title=

प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : पेणच्या गणपतींची ख्याती देशच नाही तर जगभरात आहे. सुबक मूर्ती बनवणारे पेणचे मूर्तीकार अडचणीत सापडलेत. व्यावसायिक स्पर्धा आणि नैसर्गिक संकटांमुळे पेणची मूर्तीकला संकटात सापडली आहे. सुबक आणि मनमोहून टाकणारी बाप्पांची मूर्ती बनवण्यात पेणच्या मूर्तीकारांचा कोणीही हात धरणार नाही. गणेशोत्सवासाठीच्या मूर्ती बनवण्यासाठी पेणच्या चित्रशाळांमध्ये जवळपास वर्षभर काम सुरू असतं. पण मूर्तीकारानं बाप्पाचं लोभसवाणं रुप साकारताना अनेक विघ्नांचा सामना करावा लागतो. 

यंदा पावसाच्या पाण्यात मूर्ती भिजल्या. त्या वाळवण्यात वेळ गेला. शिवाय विजेचाही खेळखंडोबा असल्यानं मूर्तीकांरांना बाप्पांची आगमनाची वेळ पाळण्यासाठी कसरत करावी लागतेय.

पेण परिसरात चित्रशाळा आहेत. मूर्तीकारांच्या अडचणी सोडवण्यासाठी समूह विकास योजनेची आखणी केली होती. पण त्याचं पुढं काहीच झालं नाही.

पेणकरांच्या अनेक पिढ्यांनी गणेशाला आकर्षक रुप देण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं. पेणकरांची ही कला वाढत्या स्पर्धेमुळे लयाला जाऊ नये हीच माफक अपेक्षा.