कैलास पुरी, झी २४ तास, पिंपरी चिंचवड : कर्करोगाचं निदान आजाराच्या सुरुवातीलाचं झालं तर बहुंताश कर्करोग रुग्णांना या आजारातून मुक्ती मिळते. पिंपरी चिंचवडच्या वाकडमध्ये 'ऍक्टोरिअस इनोव्हेशन अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड' या संस्थेनं कर्करोगाला कारणीभूत पेशी सुरुवातीलाच ओळखण्यासाठी चाचणीचं महत्वपूर्ण संशोधन केलं.
रक्तातील कर्करोगाच्या पेशी ओळखता याव्यात यासाठी करण्यात येणारी लिक्विड बायोप्सी तंत्रज्ञानावर आधारीत चाचणी आता भारतातही सहजरित्या उपलब्ध झालीय.
'ऍक्टोरिअस इनोव्हेशन अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड' या संशोधन संस्थेच्या 'ऑन्कोडिस्कवर' या चाचणीत संशोधन केलयं. कर्करोग होण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींतील कर्करोगाच्या पेशी शोधण्यासाठी कॅन्सर निदान झालेल्या रुग्णांतील पेशींचं स्थलांतर झालयं का? हे शोधण्यासाठी ही चाचणी उपयुक्त ठरू शकेल, असं या संशोधनाचे प्रमुख जयंत खंदारे यांनी म्हटलंय.
लिक्विड बायोप्सी तंत्रज्ञानावर आधारित चाचणीचा अमेरिकेतील खर्च एक लाख रुपये होतो, मात्र त्याच पद्धतीची ही चाचणी अवघ्या १५ हजार रुपयामध्ये शक्य होणार आहे.
कॅन्सरसाठी लवकर निदान महत्त्वाचं आहे. ऑन्कोडिस्कवर या चाचणीमुळे हे शक्य आहे... आणि तेही कमी खर्चिक, म्हणूनच ही चाचणी आरोग्य क्षेत्रात क्रांती करणारी ठरणार आहे.