रत्नागिरी : कोकणात गणेशोत्सवाच्या जल्लोषाला प्रारंभ झालाय गणेश भक्तांनी अत्यंत पारंपारिक पद्धतीने आपल्या डोक्यावरून गणपती बाप्पांची मूर्ती नेत आपल्या गणेशोत्सवाला प्रारंभ केलाय... शेताच्या बांधावरून - चिंचोळ्या वाट मधून गणराजाच्या मूर्ती सर्व कुटुंबीयांनी एकत्र उचलून धरत मुख्य रस्त्यावर आणल्या... मग आपल्या गणराजाची मूर्ती आपल्या डोक्यावर घेत, गणपती बाप्पा मोरया-मंगलमूर्ती मोरयाच्या जय घोषात भात शेतीचे बांद तुडवत गणपतीच्या मिरवणुका काढण्यात आल्या... आता पुढील दहा दिवस कोकणात घराघरात उत्साहाच वातावरण असणार आहे.
गणपतीला गावी जात नाही, असा कोकणी चाकरमानी सापडणं मुश्कील... कुणी एसटीनं, तर कुणी लक्झरी गाडीनं... कुणी खासगी कारमधून, तर कुणी कोकण रेल्वेनं... दरवर्षी गणपतीला न चुकता गावी जाणार म्हणजे जाणारच... कोकणी चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्नन पार पडावा, यासाठी एसटी महामंडळानं शेकडो बसगाड्या कोकणात सोडल्यात... मुंबई गोवा महामार्गावर सर्वत्र वाहतूक पोलीस तैनात करण्यात आलेत. गणेशभक्तांना टोलमाफी केल्यानं तळकोकणात जाण्यासाठी गणेशभक्त मुंबई बंगळुरू एक्स्प्रेस वेचा वापर करतायत... कोकण रेल्वेनं देखील जादा रेल्वेगाड्यांची सोय केल्यानं आणि त्या गाड्या वेळेवर सोडल्यानं रस्ते वाहतुकीवरचा ताण थोडा हलका झाला.
गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे कौतुकास पात्र ठरलीय. मुंबई गोवा महामार्गावर पडलेले खड्डे लक्षात घेऊन कोकण रेल्वेने जादा गाड्यांचे नियोजन केलं होतं. विशेष म्हणजे दररोज सुटणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रकही कोकण रेल्वेनं कोलमडू दिलेलं नाही. जास्तीत जास्त प्रवासी रेल्वेतून कसे जातील याची खबरदारी घेत कोकण रेल्वेने जादा डबेदेखील जोडले होते. यावर्षी सीआरपीएफचे जवानही प्रत्येक स्थानकात तैनात करण्यात आलेत. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक स्थानकात वैद्यकीय सेवा देखील कोकण रेल्वेनं यावेळी उपलब्ध करुन दिली होती.