चंद्रशेखर भुयार,झी मीडिया,मुरबाड : मोहाची फुल म्हटलं की मोहाची दारू डोळ्यांपुढे येते. पण याच मोह फुलांपासून आदिवासीबहुल भागातली मोठी समस्या सुटणारय. गावठी दारुवरच्या बंदीनंतर गडचिरोलीतल्या आदिवासींनी मोह फुलांचे विविध पदार्थ बनवले. आता मुरबाड तालुक्यातल्या आदिवासींनीही मोह फुलांपासून लाडू बनवलेयत.वननिकेतन संस्थेतर्फे स्थानिक आदिवासींचा एक गट अभ्यास दौऱ्यासाठी गडचिरोलीला गेला. मोह फुलाचे विविध पदार्थ त्यांनी पाहिले.
या दौऱ्यात पदार्थांचं आहारमुल्यही तपासलं गेलं. दूध आणि मनुक्यापेक्षा मोहफुलांमध्ये प्रथिनं आणि जीवनसत्व तिपटीनं अधिक असतात. त्यामुळं आदिवासी भागांतल्या कुपोषणाच्या समस्येवर रामबाण उपाय सापडलाय, असं म्हणावं लागेल. आदिवासी मुलांना पौष्टिक अन्न म्हणून जे पदार्थ दिले जातात त्यात या लाडवांचा समावेश करावा अशी मागणी श्रमिक मुक्ती संघटनेनं केलीय.
सुकवलेल्या मोह फुलांमध्ये तीळ, शेंगदाणे आणि गुळ घालून हे लाडू बनवतात. मुरबाड तालुक्यातही मोह मुबलक प्रमाणात मिळतो. संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांमुळं या परिसरात जंगल संपदा वाढतेय. त्यामुळं भविष्यात मोह फुलांना तोटा नाही. मार्च ते मे या काळात मोह फुलांचा बहर... जंगलात फुलांचा खच पडलेला असतो. ती गोळा करून सुकवतात, आणि मग लाडू बनवतात. नाणेघाटच्या प्रवेशद्वारावर वनविभागानं या महिलांना विक्री केंद्र उपलब्ध करून दिलंय. औषधी गुणधर्म असेलल्या मोह फुलांच्या लाडूमुळे आदिवासींना उपजीविकेचं नवं साधनं मिळालयं.