FYJC Admission : अकरावी प्रवेशप्रक्रिया आजपासून; विद्यार्थ्यांनो असा करा अर्ज

FYJC Admission :  शिक्षण विभागातर्फे इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी विद्यार्थ्यांकडून अकरावी प्रवेशाचा पहिला भाग भरून घेतला जातो. त्यानुसार आजपासून विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा अर्ज भरता येणार आहे.

आकाश नेटके | Updated: May 25, 2023, 11:33 AM IST
FYJC Admission : अकरावी प्रवेशप्रक्रिया आजपासून; विद्यार्थ्यांनो असा करा अर्ज title=

FYJC Admission : दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आता अकरावी (FYJC) प्रवेशाचे वेध लागले आहेत. अशातच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरु केली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे राबविल्या जाणाऱ्या इयत्ता अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया आजपासून सुरु होणार आहे. त्यामुळे इयत्ता दहावीच्या निकालापर्यंत (SSC Result) ऑनलाइन प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरता येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक अशी प्राथमिक माहिती नोंदणी करून अर्जाच्या भाग एकमध्ये भरता येणार आहे.

विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी नोंदणी प्रक्रिया आणि अर्ज भरण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. त्यामुळे दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना 20 मे ते दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत प्रवेशप्रक्रियेत नोंदणी करता येणार आहे. तर इयत्ता अकरावी प्रवेश अर्जाचा दुसरा भाग दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर भरता येणार आहे.. अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना https://11thadmission.org.in या संकेतस्थळावर जाऊन माहिती भरावी लागणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक अशी प्राथमिक माहिती भरावी लागणार आहे.

प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या भागात विद्यार्थ्यांना वैयक्तिक माहिती भरावी लागणार आहे. तर दुसऱ्या भागात विद्यार्थ्यांना ज्युनिअर कॉलेजांचे पसंती क्रमांक भरावे लागणार आहे. या प्रवेश प्रक्रियेबाबत पालक आणि विद्यार्थ्यांना माहिती देखील शालेय स्तरावर देण्यात येणार आहे. यासोबत  प्रवेश अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना 20 ते 24 मे या कालावधीत सरावाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाने दिली आहे तसेच प्रवेशाची पहिली फेरी निकाल जाहीर झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवस राबवली जाणार आहे. दुसरी व तिसरी फेरी प्रत्येकी सात ते नऊ दिवस आणि विशेष प्रवेश फेरी सात ते आठ दिवस राबवण्यात येणार आहे.

दहावीचा निकाल कधी?

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपासूनच बारावी आणि मार्च महिन्यापासून इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा पार पडल्या होत्या. बारावीच्या विद्यार्थ्यांची निकालची प्रतिक्षा संपली असताना आता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष्य लागले आहे. त्यामुळे दहावीचा निकाल जून महिन्याचा पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. राज्यभरातून 15,77,256 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. यामध्ये 8,44,116 मुले तर 7,33,067 मुली आहेत. राज्यभरातील 5,033 परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती.