सांगली: पुणे येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांचे पार्थिव वांगी परिसरातील सोनहिरा साखर कारखान्यावर आणण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोनहिरा परिसरात दुपारी ४च्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांचं निधन झालं. शुक्रवारी रात्री मुंबईतल्या लिलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. मुंबईतून त्यांचं पार्थिव रात्री पुण्याला त्यांच्या सिंहगड या निवासस्थानी आणण्यात आलं. सकाळपासूनच पतंगराव यांच्या निवासस्थानी त्यांच्या पार्थिव दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.
पुण्यातील नागरिक, कार्यकर्ते, पतंगराव यांच्या संस्थेतील कर्मचारी, राजकीय नेते आणि विविध क्षेत्रातील मंडळींनी पतंगराव यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. त्यानंतर पतंगराव कदम यांची अंत्ययात्रा निवासस्थानापासून काढण्यात आली. यावेळी मोठी गर्दी झाली होती. काही वेळापूर्वी त्यांचं पार्थिव भारती विद्यापीठात आणण्यात आलं. त्यानंतर दुपारच्या सुमारास सांगलीत वांगी इथल्या सोनहिरा साखर कारखाना परिसरात पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.