शिवसेनेच्या थाळी आधी, विरारमध्ये १० रूपयात सुहासिनी शिवशाही थाळी

विरारमध्ये १० रुपयात थाळी सुरु

Updated: Dec 22, 2019, 09:26 PM IST
शिवसेनेच्या थाळी आधी, विरारमध्ये १० रूपयात सुहासिनी शिवशाही थाळी title=

विरार : विधानसभा निवडणुकीत १० रुपयात थाळी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर सर्वांचेच लक्ष लागले होते. परंतु सरकारच्या दहा रूपयात जेवणाची वाट न पहाता विरार येथील स्नेहा राणे व भूमीका शिर्के या दोघा महिलांनी पुढाकार घेत रविवारपासून सुहासिनी शिवशाही भोजनालय सुरू केले आहे. या भोजनालयात दहा रूपयात शाकाहारी जेवण देण्यास सुरूवात करण्यात आली असून त्यात डाळ-भात, भाजी व दोन चपात्यांचा समावेश आहे. याच जोडीला अवघ्या तीस रूपयात मांसाहारी थाळी देखील देण्यात येत असून त्यात भाजीऐवजी चिकन देण्यात येत असल्याची माहिती भूमिका शिर्के यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने १० रुपयात जेवण देण्याचं वचन दिल्यानंतर हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. त्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडमोडी घडल्या. शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आणि १० रुपयात थाळीचा प्रश्न मुद्दा पुन्हा चर्चेत आला. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज १० रुपयात शिवभोजन देण्याची घोषणा केली.

सुरुवातीला राज्यात ५० ठिकाणी ही केंद्र सुरु करण्यात येणार आहे. याचा अनुभव घेतल्यानंतर संपूर्ण राज्यभर कसा त्याचा विस्तार करु. वचननाम्यातील आमचं एक वचन असलेलं १० रुपयात जेवण हे आम्ही सुरु करत आहोत. लवकरात लवकर त्याचं उद्घाटन होईल. या उद्घाटनला आपण सर्वांनी यावं असं आमंत्रण मी सर्वांना देत आहे. असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

पण शिवसेनेची ही थाळी येण्याआधी अनेकांनी १० रुपयात थाळी आधीच सुरु केली आहे. असं असलं तरी शिवसेनेची १० रुपयात थाळी ही कशी असेल याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.