एकीकडे पुरानं केलं हैराण दुसरीकडे दुष्काळाची भयाण चिंता

जायकवाडी धरण वगळता मराठवाड्यातील सर्वच धरणं पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत

Updated: Aug 7, 2019, 08:56 PM IST
एकीकडे पुरानं केलं हैराण दुसरीकडे दुष्काळाची भयाण चिंता  title=

औरंगाबाद : राज्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली असली तरी मराठवाडा अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे मोठ्या पावसाविना मराठवाड्यावर दुष्काळाचे ढग कायम आहेत. नाशिकमध्ये दमदार पावसामुळे गोदामाई तहानलेल्या मराठवाड्यावर प्रसन्न झालीय. दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यासाठी ही दिलासादायक बातमी असली तरी दुष्काळाचे ढग कायम आहेत. शेतीसाठी अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. उस्मानाबाद जिल्हा अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. 

उस्मानाबादमध्ये सरासरीच्या २९ टक्के पाऊस झाल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय. अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणीसुद्धा केली. मात्र, पावसाअभावी हातचं पिक गेलंय. ज्यांची पिकं तरली ते सगळे शेतकरीही अजूनही पावसाची वाट पाहत आहेत. आठवड्याभरात पाऊस आला नाही तर ही पिकंसुद्धा वाया जाण्याची भीती आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात अजूनही २१९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ५६ चारा छावण्यांमध्ये ३० हजार जनावरं अजूनही आश्रित आहेत. 
 
औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजराही आभाळाकडे लागल्यात. दुबार पेरणीनंतर थोड्या पावसानं पिकांना जीवदान मिळालं. मात्र पुन्हा पावसाने ओढ दिल्याने पिकं सुकून गेली. शेतं अजूनही ओसाड दिसत आहेत. अनेकांनी पिकांवर नांगर फिरवला. 

बीड, लातूरची अवस्थाही गंभीर आहे. लातूरला पुन्हा एकदा रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे. जायकवाडी धरण वगळता मराठवाड्यातील सर्वच धरणं पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. विष्णूपुरी, शहागड बंधारा अजूनही शून्य टक्के पाणीसाठ्यावर आहे. सिद्धेश्वर, मांजरा, माजलगाव, निम्न तेरणा, सिना कोळेगाव अजूनही उणे पाणीसाठ्यात आहेत. त्यामुळे राज्यात सर्वदूर बरसणाऱ्या वरुणराजाने मराठवाड्यावरही कृपादृष्टी करण्याची गरज आहे. 
 
(उस्मानाबादहून मुस्तान मिर्झा, जालन्याहून नितेश महाजनसह आणि औरंगाबादहून विशाल करोळे यांचा हा स्पेशल रिपोर्ट)