पुणे : लहान मुलांच खेळण कधी घात करेल याचा काही नेम नाही. पुण्यातील चिमुकल्या पाच वर्षाच्या विराटचा त्याच्या खेळण्यातील सायकलने जीव घेतला आहे. 4 जून रोजी विराटचा वाढदिवस होता. वाढदिवसादिवशी वडिलांनी लाडक्या विराटने छोटीशी सायकल गिफ्ट केली होती. या सायकलवर विराट आपल्या चुलत भावाबरोबर संगमवाडी येथील आपल्या घराजवळील नदीच्या किनाऱ्याला खेळत होता. नेमके त्याचवेळी नदीचे पाणी हळूहळू वाढत होते. दोघे खेळताना विराटची सायकल अचानक उतारावरून वेगाने नदीच्या दिशेने गेली. या सगळ्यात सायकल उलटली आणि विराट नदीच्या प्रवाहात वाहत गेला.तब्बल तीन दिवसांनी विराटचा मृतदेह कल्याणीनगर येथे आढळला.
काची कुटुंबीय हे पूर्वी शेती व मासेमारीवर गुजराण करत कित्येक पिढ्या संगमवाडी पुलाजवळ नदीच्या कुशीत गुण्यागोविंदाने राहात आहेत. याच नदीच्या अंगाखांद्यावर खेळत मोठे झालेल्या प्रसाद काची यांचा पाच वर्षांचा विराट, त्याचा चुलत भाऊ सूरजबरोबर खेळत होता. विराज व सूरज नदीकिनाऱ्याच्या हिरव्यागार गवतावर खेळत होते. विराट सायकलवर बसला असताना उतारावरून त्याची सायकल वेगात नदीच्या दिशेने गेली. सायकलवर बसलेला विराट तितक्याच वेगाने नदीच्या पाण्यात फेकला गेला. ही घटना डोळ्यांसमोर पाहणारा सूरज विराटची वाट पाहत होता; पण विराट काही येईना. दहा मिनिटांनंतर त्याने घरी धाव घेत घडलेला प्रसंग सांगितला.
या घटनेनंतर अग्निशामक दल, पोलिस, कुटुंबीय व मित्रांनी विराटचा शोध घेण्यास सुरवात केली. दोन दिवस उलटूनही विराट काही सापडला नाही. अखेर शुक्रवारच्या सकाळीकल्याणीनगर येथील नदीपात्राजवळ छोट्या मुलाचा मृतदेह आढळल्याची माहिती जीवरक्षक राजेंद्र काची यांना मिळाली.