कोल्हापूर : कोल्हापुरात मटण दुकानावर छापा मारण्यात आला आहे. असुविधा आणि कायद्याचे निकष पाळले नसल्यानं अन्न व औषध प्रशासनाची कारवाई केली आहे. मटण दुकान बंद करण्याची नोटीस मटण विक्रेत्यांना देण्यात आली आहे. मटण विक्रीचे निकष न पाळल्याने हे छापे मारण्यात आले आहेत. अन्न आणि औषध विभागाची कारवाई या दुकानांवर झाली आहे.
कोल्हापुरात सुरु असलेल्या मटणदर आंदोलन आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर बकऱ्यांचे भाव वाढलेत,असं असताना आता एफडीएकडून ही कारवाई करण्यात आली आहे. सुरूवातीला मटणाच्या दरात विरोध केलेल्या ग्राहकांनी आता मटणाच्या भेसळीवर देखील बोट ठेवले आहे.
दुकानावर छापा पडण्याची कोल्हापुरातील ही पहिलीच घटना आहे. राजू मटण शॉप या दुकानावर एफडीएचा छापा पडला आहे. विक्रीकरता असलेलं मटण जप्त करून त्याची विल्हेवाट देखील अधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे. असुविधा आणि निकष न पाळल्याने ही घटना घडली आहे.
480 रुपये किलो मटण असावे अशी मागणी ग्राहकांनी केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली. मात्र यानंतरही मटण विक्रेते चढ्या दराने मटण विकत असल्याचं समोर आलं. त्याचप्रमाणे मटणात भेसळ करून मटण विकल्याच्या गोष्टी देखील समोर आल्या. लोकांच्या तक्रारी वाढल्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे.
तसेच काही दिवसांपूर्वी मटण आंदोलनाच्या पाठोपाठ बकऱ्या चोरीला जाण्याची घटना देखील घडली होती. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या आवारातल्या बकऱ्यांना चोरांमुळे पोलीस संरक्षण देण्याची वेळ आली आहे. कोल्हापुरातील बाळू शिंदे हे आपल्या १३ बकऱ्या चारायला कारंडीमळ्यात गेले होते. तिथं आरोपी शिवाजी कुंभार गेला. बाळू शिंदेंच्या तब्येतीची चौकशी करुन त्यांना सर्दीच्या गोळ्या आणण्यासाठी शंभर रुपये दिले. शिंदे गोळ्या आणयला गेल्याची संधी साधून शिवाजीनं साथीदारांच्या मदतीनं सात बकऱ्या कारमध्ये कोंबल्या.
पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास केला. अवघ्या २४ तासात त्यांनी शिंदे यांच्या सात बकऱ्या शोधून काढल्या. शिवाय तीन आरोपींना कारसह अटक केली. कोल्हापुरात गेल्या काही दिवसांत वाढलेल्या मटणाच्या भावामुळे बकरा चोरल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.