Omicron : महाराष्ट्रात आढळलेल्या पहिल्या Omicron रुग्णाचं 15 दिवसांनी काय झालं? पाहा

दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊनमधून हा तरुण भारतात आला होता

Updated: Dec 8, 2021, 09:30 PM IST
Omicron : महाराष्ट्रात आढळलेल्या पहिल्या Omicron रुग्णाचं 15 दिवसांनी काय झालं? पाहा title=
संग्रहित छाया

कल्याण : जगभरासह देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने (Omicron) दहशत पसरवली आहे. देशात ओमायक्रॉनचे एकूण 23 रुग्ण आढळले असून यापैकी एकट्या महाराष्ट्रात 10 रुग्ण आहेत.

राज्यातील पहिला ओमायक्रॉन रुग्ण कल्याण-डोबिंवलीत (kalyan-dombivli) आढळला होता. दक्षिण आफ्रिकेतल्या (South Africa) केपटाऊ शहरातून (capetown) हा तरुण भारतात आला होता. या तरुणाची कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळल्याने 27 नोव्हेंबरला या तरुणाला केडीएमसीच्या कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

यानंतर त्याची जनुकीय तपासणी करण्यात आली. 4 डिसेंबरला त्याला ओमायक्रॉनची लागण झाल्याचं निदान झालं. त्यामुळे कल्याण-डोंबिलीसह राज्यात मोठी खळबळ उडाली. यानंतर 14 दिवसात या तरुणाची दोन वेळा कोरोना चाचणी करण्यात आली. 

सुदैवाने या तरुणाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. आज तरुणाचा वाढदिवस असून आजच्याच दिवशी त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. असं असलं तरी त्याला 7 दिवस क्वारंटाईन राहण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती केडीएमसी आयुक्तांनी दिली आहे.

तरुणाने घेतली नव्हती लस
ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या या तरुणाने कोविड प्रतिबंधक लस घेतली नव्हती. 24 नोव्हेंबरला त्याला सौम्य ताप आला होता. इतर कोणतीही लक्षण आढळल नव्हती. या तरुणाच्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आढळली आहे.