जळगाव : धक्कादायक बातमी. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील जामनेरमध्ये 15 कोरोनाबाधितांनी (Coronavirus) क्वारंटाईन सेंटरमधून (quarantine center) पोबारा केला आहे. या केंद्रात सोई- सुविधा मिळत नसल्याने रुग्ण पळाले असे काहींकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांची जामनेर ( Jamner) पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
जामनेर येथील क्वारंटाईन सेंटरमधून कोरोननाबाधित 15 रुग्ण पळाल्याने एकच गोंधळ उडाला आहे. दरम्यान, क्वारंटाईन सेंटरमधील सुविधांअभावी रूग्ण पळाल्याची चर्चा आहे. या क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची हेळसांड होत असून, या कोविड सेंटरमध्ये अनेक सुविधांचा अभाव आहे. वारंवार प्रशासनाकडे मागणी करून देखील लक्ष दिले जात नसल्याने अखेर या क्वारटाईन सेंटरमधून कोरोनाबाधित रुग्णांनी तिथून पळ काढला, असे सांगितले जात आहे. या फरार रुग्णांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात कोरोनाचे 15 हजार 51 नवे रूग्ण गेल्या 24 तासांत वाढले आहेत. यात 48 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत 1 हजार 713 रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. सलग पाचव्या दिवशी राज्यात 15 हजारांहून जास्त रूग्ण वाढले आहेत.
राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आता राज्य सरकारनं पुन्हा काही निर्बंध घातले आहेत. यासंदर्भात राज्य सरकारनं नवी नियमावली जाहीर केली आहे. सिनेमागृह हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. तर राजकीय सांस्कृतिक कार्यक्रम बंदी घालण्यात आली आहे. लग्नासाठी 50 लोकांची मर्यादा असून अंत्यसंस्कार 20 लोकांची मर्यादा आहे. तसेच खासगी कार्यालयात 50 टक्के उपस्थितीचे बंधन घालण्यात आली आहे.