Marathi News : कारागृह विभागात पहिल्यांदाच महिला बंदी रेडिओ जॉकीचे काम करत आहे. महाराष्ट्र कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक,अमिताभ गुप्ता यांचे शुभहस्ते भायखळा जिल्हा कारागृह येथे महिला विभागामध्ये महिला बंद्यांच्या मनोरंजनाकरीता “FM रेडीओ सेंटर” चे उद्घाटन करण्यात आले आहे. सदर FM रेडिओ सेंटर मध्ये पहिल्यांदाच कारागृहातील महिला बंद्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे.
भायखळा जिल्हा कारागृहातील (महिला) बंदी श्रीमती श्रध्दा चौगुले यांनी FM सेंटर मध्ये रेडीओ जॉकीची भूमिका पार पाडली. यावेळी श्रध्दा चौगुले यांनी अमिताभ गुप्ता यांची रेडीओ FM वर मुलाखत घेऊन कारागृह विभागातील सुधारणा व सोईसुविधेंबाबत चर्चा केली असता अमिताभ गुप्ता साहेब यांनी FM रेडिओ सेंटरवरून कारागृहातील बंद्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होऊ नये हा सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन बंद्यांना देण्यात आलेल्या सोईसुविधा व यापुढे देण्यात येणाऱ्या सोईसुविधाबाबत चर्चा करुन मार्गदर्शन केले. तसेच विदेशी बंद्यांसोबत चर्चा केली असता विदेशी बंद्यांनी कारागृहात e-Mulakatव इतर सोईसुविधा सुरू केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन आभार मानले.
कारागृहामध्ये विविध प्रकारच्या गुन्ह्यातील बंदी बंदिस्त असतात. कारागृहात येणाऱ्या प्रत्येक बंदीच्या मनात नेहमी अस्वस्थता असते. आपला परिवार, आपले भविष्य, आपली केस याबाबत नेहमी व्दंध्द चालू असते त्या विचारामुळे प्रत्येक बंद्यांच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होतात. यापासून थोडासा विरुंगळा म्हणून व बंद्यांना सकारात्मकतेकडे नेण्याकरीता कारागृहात FM रेडिओ सेंटर हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.
सदर FMसेंटरवरून महिला बंदी रेडिओ जॉकी म्हणून काम पाहणार आहेत व विविध उपक्रम सादर करणार आहेत. यामध्ये सकाळी भावगीते, भजन, अध्यात्मिक कार्यक्रम सादर करण्यात येतील. दुपारी १२:०० वा. ते ०३:०० वाजेपर्यत मराठी, हिंदी गीत सादर करण्यात येतील तसेच बंद्यांसाठी आपकी फर्माईश हा कार्यक्रम सुध्दा सादर करण्यात येईल.
यापूर्वी येरवडा मध्यवर्ती कारागृह, नागपूर मध्यवर्ती कारागृह, अमरावती मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह इत्यादी कारागृहामध्ये FM रेडिओ सेंटर सुरू करण्यात आलेली आहेत.या सर्व ठिकाणी पुरूष बंदी रेडिओ जॉकीचे काम सांभाळत आहेत परंतू भायखळा जिल्हा कारागृह येथे सुरू करण्यात आलेल्या FM रेडिओ सेंटर मध्ये प्रथमच महिला बंदीस संधी मिळालेली आहे. सदरच्या उपक्रमात अनेक महिला बंद्यांना रेडिओ जॉकीचे प्रशिक्षण देण्यात येईल जेणेकरुन कारागृहातून सुटका झाल्यानंतर भविष्यात त्यांना रोजगारासाठी कौशल्ये त्यांच्याकडे असतील.