श्रीकांत राऊत,यवतमाळ : यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील चिकणी कसबा येथे ऑनर किलिंगचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून वडिलाने मुलीसह जावयावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात जावई सागर काशीनाथ अंभोरे वय २६ व मुलगी शुभांगी वय २६ हे दोघे पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत.
दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सागर आणि शुभांगी यांनी 2016 मध्ये सहमतीने आंतरजातीय विवाह केला. या विवाहाला शुभांगीचे वडील दादाराव माटाळकर यांचा विरोध होता, मुलीने गावातील तरुणासोबतच प्रेमविवाह केल्याने ते कुटुंबासह आर्णी येथे स्थायिक झाले होते.
दरम्यान लग्नाच्या ५ वर्षानंतर दादाराव यांनी शुभांगी आणि सागर यांना ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांचेवर चाकुने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. याप्रकरणी आर्णी पोलिसांनी आरोपी दादाराव माटाळकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.
सागरचे काका नारायण नानाजी अंभोरे यांनी दादाराव माटाळकर यांच्याविरोधात आर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी दादारावविरूद्ध भादंवि ३०७, ४५० तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन करीत आहे.