औरंगाबाद : टोमॅटोचे भाव प्रचंड कोसळल्यामुळं औरंगाबादमधील टोमॅटो उत्पादक शेतक-यांनी टोमॅटो तोडणी करुन रस्त्यावर फेकून दिले आहेत. दर्जेदार टोमॅटो पिकवूनही भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. किलोला फक्त तीन रुपये भाव आलाय. दरम्यान, जालन्यातही तीन दिवसांपूर्वी केवळ 1.50 रुपया भाव मिळाल्याने शेतकरी हैरान आहे.
शेतीमालाला चांगला भाव मिळत नसल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. टोमॅटोचा डोंगरच जणू औरंगाबाद जिल्हात पाहायला मिळतो आहे. कधी निसर्ग कोपतो तर कधी बाजारपेठ भाव कोसळतात. त्याचा फटका बळीराजाला बसतो. गंगापूर तालुक्यातील शिवरा, गाजगाव, सिल्लेगाव, सावंगी, माळी वाडगाव, धामोरी या शिवारांत सध्या टोमँटो असा रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे.
टोमॅटोचे भाव इतके पडलेत की शेतकऱ्याला उत्पादन खर्चही निघेनासा झालाय. एक एकरला जवळपास सव्वा लाख खर्च झाला. मात्र त्यातून उत्पन्न मिळेल ही आशा फोल ठरली आणि दुर्दैवाने फेकण्याशिवाय पर्याय उरला नाही, अशी निराशाजनक प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिलेय. टोमॅटोच्या एका कॅरेटला फक्त 120 रुपयांवर आलाय म्हणजे किलोला फक्त 3 रुपयांवर भाव मिळाला आहे.