आम्हाला भीक नको! म्हणत शेतक-याची आत्महत्या

आम्हाला भीक नको, आमच्या शेतमालाला भाव द्या. आम्हाला सन्मानाने जगू द्या, अशा वाक्यांसह शेती व्यवस्थेची दाहकता आणि कर्जमुक्तीचा फोलपणा पत्रात लिहून वाशिमच्या शेतकऱ्याने यवतमाळ मध्ये आत्महत्या केलीय. 

Updated: Dec 8, 2017, 07:13 PM IST
आम्हाला भीक नको! म्हणत शेतक-याची आत्महत्या title=

यवतमाळ : आम्हाला भीक नको, आमच्या शेतमालाला भाव द्या. आम्हाला सन्मानाने जगू द्या, अशा वाक्यांसह शेती व्यवस्थेची दाहकता आणि कर्जमुक्तीचा फोलपणा पत्रात लिहून वाशिमच्या शेतकऱ्याने यवतमाळ मध्ये आत्महत्या केलीय. 

सरकारच्या जाचाला कंटाळून आत्महत्या...

ज्ञानेश्वर नारायण मिसाळ असं मृत शेतकऱ्याचं नाव असून वाशिमच्या सोयजना इथले ते रहिवाशी आहेत. भारत लाँज मध्ये विष प्राषन करून त्यानं जीवनयात्रा संपवली. शासनाची कर्जमुक्ती केवळ मलमपट्टी वाटते, त्याचा अजूनही फायदा झाला नाही, आम्हाला कर्जमुक्ती सोबत शेतमालाला भाव द्या. गाव भकास होत आहे कारण शेती उत्पन्नावर जगू शकत नसल्यानं शेतकरी पुण्या मुंबईकडे जातात. असं या शेतक-यानं आत्महत्या करण्यापूर्वी एका चिठ्ठीत लिहून ठेवलंय. 

किती होतं त्यांच्यावर कर्ज?

ज्ञानेश्वर मिसाळ यांच्या शेतात ४०० संत्रीची झाडे आहेत त्यापैकी २०० झाडं ही करपली. मात्र कार्यालयांच्या चकरा मारूनही नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे ज्ञानेश्वर यांच्याकडं आयसीआयसीआय बँकेचे ३ लाख ६८ हजार आणि एडीसीसी चं ७८ हजार कर्ज थकलं होतं. कर्जाचं व्याज भरणं अवघड झालं होतं. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलंल.. 

मराठवाड्यातही शेतकरी आत्महत्या

मराठवाड्यात कापूस उत्पादक शेतक-यांचे बोंडअळीनं पिक उद्धवस्त केलं आहे,  अनेकांची स्वप्न या बोंड़अळीनं उद्धव्सत केली आहेत त्यात आता बोंडअळीच्या या नुकसानीमुळं शेतक-यांच्या आत्महत्या सुरु झाल्या आहेत. औरंगाबादचा ३० वर्षीय शेतकरी पंढरीनाथ भवरे यानं आत्महत्या केली आहे. शेतात विषारी औषध प्राशन करून त्यानं आत्महत्या केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तो बंडअळीमुळ झालेल्या नुकसानीनं चिंतेत असल्याचं त्याच्या भावानं सांगितल, त्यामुळं रात्रीतून त्यानं आपली जिवन यात्रा संपवली.  

शेतक-याला सामुहिक श्रद्धांजली

विदर्भवादी संघटनांनी नागपुरात व्हरायटी चौकात गांधी पुतळ्याजवळ ज्ञानेश्वर मिसाळ या शेतक-याला सामुहिक श्रद्धांजली वाहिली. वाशीम जिल्ह्यातील सोयजवा इथल्या शेतकरी ज्ञानेश्वर नारायण मिसाळने विदर्भाशिवाय पर्याय नाही असे चिठ्ठीवर लिहून आत्महत्या केली. मी जग ओळखायला विसरलो, तुम्ही जग ओळखा. शेतकऱ्यांचं काही खरं नाही. वेगळा विदर्भ झाल्याशिवाय पर्याय नाही, असे त्याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीत लिहले होते. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी ज्ञानेश्वर मिसाळने दिलेले हे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका. यासाठी विदर्भवाद्यांनी पुकारलेल्या ११ डिसेंबरच्या बंदला विदर्भातील जनतेने मोठ्या संख्येत सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले.