कॅन्सरसंबंधी असणाऱ्या गैरसमजांमुळे एका पित्याने आपल्या 12 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. 23 डिसेंबरला कोरेगाव तालुक्यातील हिवरे गावातील शेतात मुलाचा मृतदेह आढळला होता. स्थानिक लोकांनी माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी शवविच्छेदनासाठी पाठवत तपास सुरु केला होता.
पोलीस तपासादरम्यान काही धक्कादायक खुलासे झाले. कारण मुलाची त्याच्या जन्मदात्या बापाने हत्या केली होती. पण यापेक्षा धक्कादायक म्हणजे त्याने आपल्याला अशक्तपणा वाटत असल्याने त्याने मुलाला संपवलं होतं. अशक्त वाटत असल्याने त्याला आपल्याला कॅन्सर झाला आहे असं वाटत होतं. आपला मुलगाही या आजाराच्या तावडीत सापडू नये अशी भीती त्याला वाटत होती. याच भितीतून त्याने मुलाला जीवे मारलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपला मृत्यू झाल्यानंतर मुलाचा सांभाळ कोण करेल याची चिंता त्याला सतावत होती.
पोलिसांनी मुलाची हत्या केल्याप्रकरणी शेतकरी पित्याला अटक केली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असता दोरीने गळा दाबून त्याची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं. पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक पथक तयार केलं होतं. चौकशीदरम्यान पोलिसांनी पिताच आरोपी असल्याचे पुरावे मिळाले.
समीर शेख यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की, "आरोपी विजय खताळला आपल्याला कॅन्सर झाला आहे असं वाटत होतं. तसंच आपल्या मुलालाही हा आजार होईल अशी भीती सतावत होती. तसंच आपल्याकडे जगण्यासाठी काही महिने शिल्लक असून आपल्या एकुलत्या एक मुलाचा सांभाळ कऱण्यासाठी कोणीच नाही याची चिंता त्याला सतावत होती. पण विजयला कधीच कॅन्सर झाला नव्हता. त्याला अशक्तपणा हाच कॅन्सर वाटत होता".
दरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केल्याची माहिती समीर शेख यांनी दिली आहे. "पोलिसांना सुरुवातीला हा मानवी बळीचा प्रकार असल्याचं वाटत होतं. पण आता तो दावा फेटाळण्यात आला आहे. विजय खताळ भावनात्मकरित्या अस्थिर होता. त्याला धक्का बसला होता. आम्ही त्यासंबंधी तपास करत आहोत. आम्ही त्याचे दावे पडताळून पाहत आहोत. कोर्टात हजर करण्यात आलं असता त्याला 29 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे".