औरंगाबादच्या रस्त्यावर नोटांचा ढिग, पैसे घेण्यासाठी तुफान गर्दी

नोटबंदीनंतर देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये खोट्या नोटा आणि काळा पैसा सापडल्याच्या घटना घडल्या.

Updated: Aug 21, 2017, 10:31 PM IST
औरंगाबादच्या रस्त्यावर नोटांचा ढिग, पैसे घेण्यासाठी तुफान गर्दी title=

औरंगाबाद : नोटबंदीनंतर देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये खोट्या नोटा आणि काळा पैसा सापडल्याच्या घटना घडल्या. पण नोटबंदीच्या आठ महिन्यानंतर औरंगाबादमध्ये रस्त्यावर पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटांचा ढिग सापडला आहे. या नोटा घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. पण या सगळ्या नोटा खोट्या असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांचा हिरमोड झाला.

औरंगाबादच्या एमआयडीसी रोडवर या पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या खोट्या नोटा सापडल्या. या भागामध्ये नोटा असल्याची माहिती मिळताच शहरातल्या वेगवेगळ्या भागातून नागरिक पैसे घेण्यासाठी आले. नागरिकांच्या गर्दीमुळे रस्त्यावर ट्रॅफिक झाला होता. एवढच नाही तर अनेक जण स्वत:च्या गाड्या सोडून नोटा घेण्यासाठी जात होते.

एमआयडीसी रोडवर नोटा सापडल्याचं कळल्यावर अनेक जण पिशव्या घेऊनही आले होते पण नोटा खोट्या असल्यामुळे हे सगळे नाराज झाले. नोटा गोळा करण्यासाठी गर्दी झाल्याचं लक्षात आल्यामुळे पोलीसही या ठिकाणी आले होते. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन यावेळी पोलिसांनी केलं. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून चौकशीला सुरुवात केली आहे.