'रॉ' चा एजंट सांगून महिलेला लग्नाचे आमिष, तोतया गुप्तहेरास बेड्या

 नागपूरच्या एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवणाऱ्या एका ठगबाजाला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.

Updated: Jun 13, 2019, 06:36 PM IST
'रॉ' चा एजंट सांगून महिलेला लग्नाचे आमिष, तोतया गुप्तहेरास बेड्या  title=

जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : गुप्तचर संस्था 'रॉ' चा एजंट सांगून नागपूरच्या एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवणाऱ्या एका ठगबाजाला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद इमरान नूर खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा मुंबईच्या भिवंडी येथील राहणार आहे.तक्रारदार महिला हा घटस्फोटित असून ब्युटी पार्लरचा व्यवसाय करते. सुमारे २ महिन्यापूर्वी फेसबुकवरून महिलेची ओळख मोहम्मद इमरान (वय ३९ वर्षे) सोबत झाली. मैत्रीनंतर फेसबुकवरच दोघांचे चॅटिंग सुरु झाले. चॅटिंग दरम्यान त्यावेळी आरोपीने स्वतःला रॉ या गुप्तहेर संस्थेचा गुप्तहेर असल्याची बतावणी केली होती. महिलेला विश्वास वाटावा म्हणून त्याने मोठं मोठ्या बाता मारल्या. महिला अलगद त्याचा जाळ्यात अडकली. १५ दिवसांपूर्वी महिलेशी लग्न करण्यासाठी आरोपी मोहम्मद इमरान नागपुरात आला आणि तक्रारदार महिलेच्याच घरी राहू लागला. यादरम्यान त्याने महिला आणि तिच्या नातेवाईकांकडून वेळोवेळी ३० हजार रुपये उकळले.

इमरान हा खरंच रॉ चा गुप्तहेर आहे की नाही ? याविषयी महिलेच्या मनात शंका उत्पन्न झाल्यावर तिने त्याची खरी ओळख सांगण्यासाठी तगादा लावला. मोहम्मद हा सारखा खोटा बोलत असल्याचे लक्षात आल्यावर महिलेने पोलीस स्टेशन गाठून पोलिसांत तक्रार दिली. मोहम्मद हा ८ भाषा बोलत असून मुंबई पोलीस दलात अनेक अधिकारीही त्याचे ओळखीचे असल्याचे त्याने सांगितले. हे मोहम्मद प्रकरण पाहून नागपूर पोलिसही काही काळासाठी दचकून गेले होते. पोलिसांनी मोहम्मद इमरानची कसून चौकशी केली. त्यात तो मुंबईच्या भिवंडी येथे शिवाजी नगरात राहत असल्याचे समोर आले.  शिवाय तो कुठल्याही संस्थेचा गुप्तहेर नसून तो लोकांची अशीच फसवणूक करत असल्याचे निष्पन्न झाल्यावर मोहम्मद इमरानविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. यापूर्वीही त्याने अशाप्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.