मुंबई : आधीच अवकाळी पावसाचं सावट असताना आता चक्रीवादळाचं संकट रत्नागिरीवर असल्याचं एक मेसेज व्हायरल होत आहे. या चक्रीवादळाचा तडाखा बसणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या व्हायरल मेसेजची सत्यता झी 24 तासने पडताळली आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला पुन्हा एकदा चक्रीवादळाचा तडाखा बसणार अशी चर्चा रंगलीये. मात्र, रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. या व्हायरल मेसेजमध्ये कोणतेही तथ्य नाही असं स्पष्टीकरण दिलं आहे.
नागरिकांनी विनाकारण घाबरुन जाऊ नये, असं आवाहन जिल्हाधिका-यांनी केलं. त्यामुळे कोकणवासीयांनी तुर्तास सुटकेचा निःश्वास सोडला आहे. या व्हायरल मेसेजवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आला आहे. आज आणि उद्या पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो. तर या वादळामुळे कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण निर्माण झालं असून आंबा आणि काजू पिकांना याचा फटका बसू शकतो.
बंगालच्या उपसागरात अग्नेय दिशेनं एक वादळ घोंगावत भारताच्या दिशेनं येत आहे. 2022 मधील हे पहिलंच वादळ आहे. या वादळामुळे पुन्हा हाहाकार उडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या चक्रीवादळाला आसनी नाव देण्यात आलं आहे.
असनी चक्रीवादळ 22 मार्चपर्यंत उत्तर आणि उत्तर पश्चिम दिशेनं पुढे सरकेल असा प्राथमिक अंदाज आहे. आसनी (Asani) हे नाव श्रीलंकेनं दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार 20 मार्चपर्यंत चक्रीवादळ अंदमान आणि निकोबार बेटाजवळून उत्तरेकडे पुढे सरकेल.
या चक्रीवादळाचा परिणाम दक्षिण भारतात होणार आहे. केरळ, तमिळनाडू, पदुचेरी कर्नाटका राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा आहे. दुसरीकडे लडाख-जम्मू-काश्मीर राज्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे.