गडचिरोलीच्या जंगलात डायनॉसोरच्या पाऊलखुणा

कोट्यवधी वर्षांपूर्वी ज्या डायनॉसॉर्सचा पृथ्वीवर वावर होता. त्यांच्या खाणाखुणा इथं सापडल्या आहेत. त्यामुळे देशी, परदेशी संशोधकांची पावलं गडचिरोलीकडे वळली आहेत.

Updated: Feb 5, 2018, 11:42 PM IST
गडचिरोलीच्या जंगलात डायनॉसोरच्या पाऊलखुणा title=

आशीष अम्बाडे, झी मीडिया, गडचिरोली : कोट्यवधी वर्षांपूर्वी ज्या डायनॉसॉर्सचा पृथ्वीवर वावर होता. त्यांच्या खाणाखुणा इथं सापडल्या आहेत. त्यामुळे देशी, परदेशी संशोधकांची पावलं गडचिरोलीकडे वळली आहेत.

डायनॉसोरच्या खुणा

कोट्यवधी वर्षांपूर्वी पृथ्वीवर यांचं अधिराज्य होतं. त्याच्यानंतर इतका महाकाय आणि शक्तिशाली प्राणी या पृथ्वीतलावर झाला नाही. हेच महाकाय डायनॉसॉर गडचिरोली जिल्ह्यातही होते. त्यांच्या अस्तित्वाच्या नव्यानं खुणा सापडल्या आहेत. सिरोंचा तालुका हा प्राणहिता आणि गोदावरी नद्यांवर वसलेला...याच भागात जैवविविधतेच्या खुणा आढळून येतात...

डायनॉसोरचा पाठीचा मणका

डॉ. धनंजय मोहबे आणि कापगते या संशोधकांना तसंच वाशिंग्टन आणि मिशीगन विद्यापीठातून आलेल्या जार्ज आणि जेफ या दोन संशोधकांना डायनॉसॉरच्या अस्तित्वाच्या नव्या खुणा सापडल्या आहेत. त्यात लहान डायनॉसोरचा पाठीचा मणका, मानेचा भाग आणि  मोठया डायनॉसॉरच्या पायाचं एक बोट सापडलंय. तब्बल सत्तर ते ऐंशी डायनॉसॉरशी संबंधित हाडांचे अवशेष इथे सापडलेत...दीड कोटी वर्षांपूर्वीचे हे अवशेष असल्याचा दावा करण्यात येतोय.  

हे बघा : 'जुरासिक वर्ल्डः फॉलन किंगडम' चा थरारक ट्रेलर रसिकांच्या भेटीला

याआधी सापडला होता सांगाडा

१९५९ मध्ये कोत्तापल्ली गावात उत्खननाच्यावेळी 'सारापोट' प्रकारातल्या डायनॉसोरचा पुर्ण सांगाडा सापडला होता. त्यानंतर सतत देश- विदेशातल्या संशोधकांच्या नजरा सिरोंचा तालुक्याकडे वळल्या होत्या. त्यानंतर देश विदेशातल्या जीवशास्त्र संशोधकांच्या सिरोंचात भेटीगाठी सुरू आहेत. वनविभागाने याआधीही या भागातल्या संशोधनाला चालना देण्यासाठी वडधममध्ये एका जीवाश्म संग्रहालयाची निर्मिती केली आहे. त्यातून कोट्यवधी वर्षांपूर्वीच्या या प्राण्यांच्या अस्तित्वाचा माग काढणं आणखी सोपं होणार आहे.