मुंबई : मंत्रीपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांसह सर्व माजी मंत्र्याना आपला सरकारी ऐवज परत करावा लागणार आहे. ९ नोव्हेंबर ला जुन्या सरकारचा कार्यकाळ संपुष्टात आला. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभाग पाहत होते. दरम्यान भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी या तिघांना राज्यपालांनी सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले. पण दिलेल्या अवधीत कोणीही बहुमत सिद्ध करु शकले नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. पर्यायाने सर्व पदं आणि खाती संपुष्टात आली. त्यामुळे आधीच्या सरकारमधील सर्वांनाच आपले बंगले आणि कार्यालय सरकारला परत द्यावे लागणार आहेत.
सरकार स्थापन झाल्यावर मुख्यमंत्र्यांसह मंत्रीमंडळाला सरकारी सुविधा दिल्या जातात. ज्यामध्ये मंत्र्याचे बंगले, कार्यालय, गाड्या या सुविधा असतात. पण कार्यकाळ संपल्यानंतर या सुविधा सामान्य विभाग प्रशासनाला परत द्यावा लागतात. यांच्यामार्फत आज सर्वाची यादी केली जाईल. त्यानंतर यादीनुसार सर्व सामान पाहून ते जमा केले जाईल. कार्यकाळ संपल्यानंतर यासंदर्भातील निर्देश मंत्रीमंडळाला देण्यात आले होते.