अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी अटकेत असलेला अहमदनगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमची नाशिक कारागृहातून सुटका झालीय. पंधरा हजाराच्या जातमुचलक्यावर छिंदमची सुटका करण्यात आलीय.
कारागृहातून बाहेर येताच छिंदम अज्ञातस्थळी रवाना झालाय. छिंदमवर नगरच्या पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झालेत. पहिल्या गुन्ह्यात त्याला आधीच जामीन मंजूर झाला होता. मात्र त्याने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्याने त्याचा जामीन रखडला होता.
छिंदमच्या वकीलाने मंगळवारी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर नगरच्या न्यायालयाने त्याच्या सुटकेचे आदेश दिले. नगर न्यायालयाचे पत्र मिळाल्यानंतर पंधरा हजाराच्या जातमुचलक्यावर छिंदम सुटलाय. सुटकेनंतर तो अज्ञातस्थळी रवाना झालाय. मात्र छिंदमला दररोज पोलीस ठाण्यात हजर राहण्याची अट घालण्यात आलीय.