हिरोईन बनवण्याचं आमिष दाखवून तरुणींना गंडा

चित्रपटातील नायिकेची मुख्य भूमिका देण्याचे आमीष दाखवून हर्ष सपकाळे या भामट्याने नाशिकमधील नवोदित अभिनेत्रीच्या पित्याला साडे नऊ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या आरोपीविरुद्ध एकूण नऊ गुन्हे दाखल झाले असून एकवीस वर्षीय तरुणांचा हा उद्योग शिक्षण क्षेत्रात चांगलाच चर्चेचा विषय ठरलाय.

Updated: Jun 27, 2017, 04:50 PM IST
हिरोईन बनवण्याचं आमिष दाखवून तरुणींना गंडा  title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : चित्रपटातील नायिकेची मुख्य भूमिका देण्याचे आमीष दाखवून हर्ष सपकाळे या भामट्याने नाशिकमधील नवोदित अभिनेत्रीच्या पित्याला साडे नऊ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या आरोपीविरुद्ध एकूण नऊ गुन्हे दाखल झाले असून एकवीस वर्षीय तरुणांचा हा उद्योग शिक्षण क्षेत्रात चांगलाच चर्चेचा विषय ठरलाय.

हर्षद आनंद सपकाळ... राहणार पाथर्डी... अभियांत्रिकीचा विद्यार्थी... नामांकित महाविद्यालयात शिकत असताना त्याने आपली मॉडलींग एजन्सी सुरु केली. सोशल मीडियाचा वापर करून बॉलिवूडमध्ये काम करणार्या तरुण-तरुणींना आकर्षित केले. नाशिकचे हॉटेल व्यावसायिक शरद संपतराव पाटीलयानाही स्वत:ची ओळख चित्रपट दिग्दर्शक म्हणून करून दिली. 

हिंदी चित्रपट अभिनेता रितेश देशमुख याच्या आगामी चित्रपटात तुमच्या कन्येला मुख्य भूमिका मिळवून देऊ, असे आश्वासन हर्षदने पाटील यांना दिले. त्यासाठी हर्षदने पाटील यांच्याकडून वेगवेगळ्या कामांसाठी टप्प्याटप्याने 9 लाख 28 हजार 500 रुपये उकळले. मात्र बराच कालावधी उलटून गेल्यानंतरही काम मिळत नसल्याचे पाहून शरद पाटील यांनी पोलिसात तक्रार केली.

मुंबई नाका पोलिसांनी हर्षद आणि त्याची पत्नी अश्विनी यांच्याविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली. मात्र त्याचे उद्योग बघून त्याच्या कथित पत्नीने त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. घरातील मोलकरीण, मित्र, आई-वडिलांसह या तरुणानं लाखोंना गंडवलंय. पोलिसांनी हर्षद यास अटक केली आहे.

आता एका तरुणीने त्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हाही दाखल केलाय. त्यामुळे हे प्रकरण गंभीर वळण घेत आहे. पाथर्डीत त्याचा चार बेडरूमचा फ्लॅट आहे. त्यानं अनेक तरुणींना जाळ्यात ओढल्याची शक्यता आहे. त्यामुळे या संदर्भात नाशिक पोलिसांनी फसगत झालेल्या तरुण तरुणींना तक्रार करण्याचं आवाहन केलंय.