Elgar conference 2021 :प्रक्षोभक भाषण प्रकरणी शरजिल उस्मानी विरोधात गुन्हा

 शरजिल उस्मानी विरोधात गुन्हा दाखल

Updated: Feb 3, 2021, 08:00 AM IST
Elgar conference 2021 :प्रक्षोभक भाषण प्रकरणी  शरजिल उस्मानी विरोधात गुन्हा  title=

पुणे : पुण्यातील एल्गार परिषद २०२१ ( Elgar conference) दरम्यान प्रक्षोभक भाषण केल्याबाबत शरजिल उस्मानी विरोधात स्वारगेट पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. शरजीलवर कडक कारवाई करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एल्गार परिषदेनंतर दिला. ऍड प्रदीप गावडे यांनी शरजिल उस्मानी विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. 

टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र शब्द जपून वापरायला हवेत अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे. 

दरम्यान, पुण्यातील एल्गार परिषदेचा व्हिडिओ मागविण्यात आला आहे. त्यातील भाषणांची चौकशी करू. त्यात काही आक्षेपार्ह वक्तव्ये केली गेली आहेत का, याची तपासणी केली जाईल. काही आक्षेपार्ह आढळल्यास पुढील कारवाई होईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख स्पष्ट केले आहे. 30 जानेवारीला पुण्यातील गणेश कला क्रीडा सभागृहात एल्गार परिषद झाली.  2017 मधील एल्गार परिषद वादग्रस्त ठरली होती. 

30 जानेवारीच्या या परिषदेत लेखक अरुंधती रॉय, माजी आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन, राजा वेमूला हे प्रमुख वक्ते होते. या सर्वच वक्त्यांनी अनेक मुद्यावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. या सभेत अनेक पुरोगामी नेते व सामाजिक कार्यकर्त्यांची सहभागी झाले होते.  

उस्मानी यांनी एल्गार परिषदेत भाषण करताना 'हिंदू समाज पूर्णपणे सडलेला आहे' असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भाजपने याची दखल घेत कारवाईची मागणी केली आहे.