विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्गमध्ये सध्या प्रचंड दहशत आहे..... इथली रात्र वैऱ्याची असली तरी रात्रीतून अचानक येणाऱ्या या आगंतुकांचा बंदोबस्त करायचा कसा? याचा प्रश्न सतावतोय.
मस्तवाल टस्करांनी सिंधुदुर्गात हैदोस घातलाय. सिंधुदुर्गात सोनावल परिसरात हिरवीगार भातशेती तरारून आलीय. अनेक शेतकऱ्यांनी वायंगणी शेती केलीय... त्या शेतीत हत्तींनी धुडगूस घातलाय. भातशेती तुडवलीय... पिकं उखडून पडलीत... कुळीथ पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.
हे सगळे टस्कर कोल्हापूर जिल्ह्यातून सिंधुदुर्गात येतात. चंदगड तालुक्यातून नामखोल गावातून सोनावलकडे येणाऱ्या मातीच्या रस्त्याने हे हत्ती सिंधुदुर्गात घुसतात. एका रेस्टहाऊसमधलं सौरऊर्जा कुंपणही हत्तींनी उद्ध्वस्त केलं. त्यानंतर केळींच्या बागांकडे मोर्चा वळवला. केळीचे घडच्या घड फस्त करुन हत्ती पुढच्या शेतात गेले. धनगरवाड्यातल्या बागाही हत्तीनं उध्वस्त केल्या.
सिंधुदुर्गात याआधीही हत्तींनी दोदामार्ग भागातल्या रहिवाशांचे हाल केलेत. इतर वन्य प्राण्यांना हुसकावणं सोपं आहे पण, हत्तींचा बंदोबस्त करणं फारच कठीण आहे. या परिसरात हत्तींची प्रचंड दहशत आहे. वनविभागानं लवकरात लवकर लक्ष देण्याची मागणी होतेय.