अश्विनी गोरे बेपत्ता प्रकरणी, खडसेंच्या भाच्याला अटक

अश्विनी गोरे प्रकरणात राजेश पाटील याचा कसा संबंध आहे, किंवा नेमकं अटकेमागील कारण काय आहे, हे पोलीस

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 11, 2017, 05:01 PM IST
अश्विनी गोरे बेपत्ता प्रकरणी, खडसेंच्या भाच्याला अटक title=

विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव : एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील याला जळगावात अटक करण्यात आली. नवी मुंबईतील महिला सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी गोरे बेपत्ता प्रकरणात संशयित म्हणून राजेश पाटीलला अटक करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

भुसावळ तालुका भाजपचा युवा मोर्चा अध्यक्ष

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा राजेश पाटील हा भाचा असल्याचं सांगण्यात येत आहे. राजेश पाटील हा भुसावळ तालुका भाजपचा युवा मोर्चा अध्यक्ष असल्याचं समोर येतं आहे. परमिट रूम, बियर बार, बांधकाम, इलेक्ट्रीक फिटिंगची शासकीय कामे, तसेच अशा कामांमध्ये भागीदारीने राजेश पाटील व्यवसाय करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

राजेश पाटीलचा प्रकरणाशी संबंध काय?

अश्विनी गोरे प्रकरणात राजेश पाटील याचा कसा संबंध आहे, किंवा नेमकं अटकेमागील कारण काय आहे, हे पोलीस तपासानंतर समोर येणार आहे. सध्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी बेपत्ता होती, त्यावेळी कुरूंदकर आणि राजेश पाटील हे संपर्कात होते. एकनाथ खडसे यांचा राजेश पाटील भाचा असल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

अश्विनी गोरे अपहरण प्रकरण

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे- गोरे यांचे अपहरण केल्याप्रकरणी, नवी मुंबई पोलिसांनी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला यापूर्वीच अटक केली आहे.  यानंतर आज जळगावातून एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटीलला अटक करण्यात आली.

राजेश या प्रकरणातील संशयित असल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या दीड वर्षांपासून अश्विनी बिद्रे- गोरे या बेपत्ता असून अभय कुरुंदकर यांनीच त्यांचे अपहरण केल्याचा आरोप अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी केला होता.

दीड वर्षांपासून त्या बेपत्ता 

पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या अश्विनी बिद्रे- गोरे यांची २०१५ मध्ये नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यात बदली झाली. मात्र त्या कंळबोली पोलीस ठाण्यात रुजू झाल्याच नाही. दीड वर्षांपासून त्या बेपत्ता आहेत. 

कुरुंदकर आणि अश्विनी बिद्रे- गोरे यांच्यात वाद

सांगलीत असताना अश्विनी बिद्रे- गोरे यांची पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्याशी ओळख झाली होती. कुरुंदकर आणि अश्विनी बिद्रे- गोरे यांच्यात वाद होता. या दोघांमधील वादाचे रेकॉर्डिंगही अश्विनी यांचे पती राजू गोरे यांच्या हाती लागले होते. 

तुझ्या पतीला गायब करणार

याशिवाय कुरुंदकर अश्विनी बिद्रे यांना मारहाण करतानाचा सीसीटीव्ही फुटेजही नुकताच समोर आला होता. तुझ्या पतीला गायब करणार, अशा धमक्या कुरुंदकर यांनी अश्विनी यांना दिल्या होत्या.