School Reopening : एप्रिल महिन्यात वार्षिक परीक्षा झाल्या की साधारण महिन्याभराहून जास्त दिवसांची भलीमोठी सुट्टी मिळण्याचा आनंद विद्यार्थांना असतो. तर, लेकरांची शाळा नाही या निमित्तानं काही गोष्टींचा तगादा नाही याचा दिलासा पालकांना असतो. याच शालेय विद्यार्थी आणि पालकांसाठी ही बातमी महत्त्वाची. कारण, विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी आता लांबली आहे. थोडक्यात नव्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरु होण्याची तारीख बदलली आहे. (education news School reopening new date 15 june 2023 latest news )
मे महिन्याची सुट्टी संपून शाळा 13 जूनला सुरु होणार अशा विचारात तुम्हीही असाल तर, थोडं थांबा. कारण, राज्यात आता नव्या शालेय वर्षाची सुरुवात होण्याची तारीख बदलली आहे. खुद्द राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीच यासंदर्भातील माहिती दिली आहे.
दरवर्षी 13 जून रोजी सुरु होणाऱ्या शाळा यापुढे 15 जूनपासून सुरु होतील अशी घोषणा केसरकरांनी केली आहे. मुंगळवारी मुंबईत त्यांनी ही घोषणा केली. विदर्भात शाळा 30 जून रोजी सुरू होतील असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये राज्य शासनाकडून विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश, बूट आणि मोजे देण्यात येणार आहेत. तर, इयत्ता 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या देण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.
इतकंच नव्हे, तर राज्यातील शाळांमध्ये शाळेत आजी-आजोबा दिवस साजरा करण्यात येणार आहे. सोबतच विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्हत व्यावसायिक शिक्षणाचे प्राथमिक धडेही दिले जाणार असल्याचं केसरकरांनी सांगितलं. यावेळी शिक्षक सेवकांची पगारवाढ, शिष्यवृत्तीमध्ये वाढ अशा मुद्द्यांवरही त्यांनी प्रकाश टाकला. कमी विद्यार्थ्यीसंख्या असणाऱ्या शाळांना टाळं लागू नये यासाठी महत्त्वाच्या सुविधा वाढवण्यावर राज्य शासनाचा भर असेल असंही ते आश्वस्त सूरात म्हणाले. थोडक्यात यंदापासून विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमासोबतच इतरही अनेक उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी राज्य शासनाचा शैक्षणिक विभाग काम करताना दिसणार आहे.
यंदाच्या वर्षी शालेय आयुष्यातील अखेरचा टप्पा असणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष निकालांकडेच लागलं आहे. परीक्षांच्या कालावधीत झालेल्या संपांचे परिणाम या निकालांवर प़णार नाहीत ना? असाच प्रश्न अनेकांच्या मनात होता. पण, आता मात्र हे चित्र स्पष्ट झालं असून, उत्तर पत्रिका तपासणीचं काम अखेरच्या टप्प्यात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं यंदाच्या वर्षी इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे निकाल वेळेतच लागणार आहेत.