मुंबई : कोरोना व्हायरसने महाराष्ट्रात उच्चांक गाठला आहे. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला थांबवण्यासाठी युद्ध पातळीवर लसीकरण करणाची गरज आहे. परंतु मुंबईत लसींची कमतरता असल्याची बातमी समोर येत आहे. गुरुवारी मुंबईतील 73 खासगी लसीकरण केंद्रांपैकी 40 केंद्रांवर कोरोना लस नसल्यामुळे लस दिल्या जाणार नाही. उर्वरित 33 लसीकरण केंद्रांवर अल्प प्रमाणात लस उपलब्ध आहेत.
अशा परिस्थितीत बीएमसीने म्हटले आहे की, ज्या लोकांना लसीचा दुसरा डोस घ्यायचा असेल, त्यांनीच लसीकरण केंद्रात यावे. पहिल्यांदा लस घेण्यासाठी योणाऱ्या लोकांना लस दिली जाणार नाही. जर लस आली तर बीएमसी आणि शासकीय लसीकरण केंद्रांवरही लसीकरण सुरू केले जाईल.
महाराष्ट्रात लस पुरेशी उपलब्ध नसल्यामुळे कोविड -19 लसीकरण मोहीम १ मेपासून सुरू होणार नाही आणि कोरोना रुग्णामध्ये झपाट्याने वाढ झाल्यामुळे लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढविण्यात आले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, "सरकारी लस केंद्रांवर 18 ते 45 वर्षे वयोगटातील लोकांना मोफत लसीकरण केले जाईल. परंतु त्यांना खासगी संस्थांमध्ये पैसे द्यावे लागतील."
टोपे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोफत लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या मते, या टप्प्यामुळे सरकारी तिजोरीवर 6500 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. ते म्हणाले, कोणत्याही नागरिकास फक्त सरकारी केंद्रांवर मोफत लस दिली जाईल.
राज्याच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, 27 एप्रिल रोजी राज्यात कोरोना रुग्णांची संख्या, 44 लाख 10 हजार 085 वर पोहोचली आहे तर, 66 हजार 179 रुग्णांनी आपला जीव गमावला. मंगळवारी 6 लाख 72 हजार 434 रूग्ण उपचार घेत होते. विभागानुसार आतापर्यंत 1 कोटी 53 लाख 37 हजार832 लोकांना लसी देण्यात आल्या असून त्यापैकी 25 लाख 15 हजार 076 रुग्ण मुंबईतील आहेत.