पावसानं दगा दिल्‍यानं यंदा भाताचं उत्‍पादन घटण्‍याची भीती

 पावसानं दडी मारल्याने भात शेतीला फटका

Updated: Oct 10, 2018, 03:01 PM IST
पावसानं दगा दिल्‍यानं यंदा भाताचं उत्‍पादन घटण्‍याची भीती title=

रायगड : शेवटच्‍या आणि महत्‍वाच्‍या टप्‍प्‍यात पावसानं दगा दिल्‍यानं यंदा भाताचं उत्‍पादन घटण्‍याची भीती आहे. भाताचं कोठार असलेल्या रायगड जिल्ह्यात देखील अशीच स्थिती आहे.

यंदाच्‍या मोसमात रायगड जिल्‍हयात सुरुवातीच्या काळात पावसानं चांगली साथ दिल्यामुळे भाताची रोपं वेळेत वाढून वर आली. श्रावण महिना संपल्‍यानंतर पावसानं दडी मारली.  त्यानंतर पाऊसच झाला नाही मात्र परतीच्‍या पावसापेक्षा त्‍यासोबत आलेलं वादळच त्रासदायक ठरलं. त्‍यामुळे पिकं आडवी होऊन नुकसान झालं.

रायगड जिल्‍हयात १ लाख २३ हजार हेक्‍टर इतकं भाताचं क्षेत्र आहे. त्‍यापैकी १ लाख ५ हजार हेक्‍टरवर भाताची लागवड करण्‍यात आली. अखेरच्‍या टप्‍प्‍यात पावसानं दगा दिल्‍यामुळे ऐन दाणे भरण्‍याच्‍या स्थितीत पिकं पिवळी पडू लागलीयत. त्‍यामुळे यंदा भाताचं उत्‍पादन घटण्‍याची शक्‍यता आहे.

पावसाअभावी एकीकडे विदर्भ, मराठवाडयातील पिकं करपून गेली असताना दुसरीकडे सरासरीइतका पाऊस होवूनही कोकणातील शेतकरी चिंतेत आहे.