सतिश मोहिते, नांदेड : उपचाराअभावी एका आदिवासी महिलेच्या दहा दिवसाच्या बाळाचा मृत्यू झाल्यानंतरही नांदेड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ढिम्मच आहे. त्यामुळे गोरगरीब आदिवासींच्या अडचणींना पारावार उरलेला नाही. नांदेड जिल्ह्यामधल्या किनवट तालुक्यातल्या मोहपूर या दुर्गम भागातल्या गावात आरोग्य उपकेंद्र आणि आरोग्य पथकही आहे. पण या दोन्ही ठिकाणी एकही आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी हजर नसतो. त्यामुळेच उपकेंद्रात दोन दिवस येऊनही तिथे कोणीच नसल्यानं, उपचारांअभावी सागर कुरुडे या महिलेच्या अवघ्या दहा दिवसांच्या बाळाचा मृत्यू झाला.
गंभीर बाब म्हणजे या घटनेच्या दोन दिवस आधी मोहपूर गावातल्याच मनिषा खूपसे हिला प्रसूतीसाठी उपकेंद्रात नेलं गेलं होतं. पण त्यावेळी तिथे परिचारिकाच नव्हती. त्यामुळे गावातल्या महिलांनी उपकेंद्राबाहेरच साडयांचा तात्पुरता आडोसा उभारुन तिची प्रसूती केली. विशेष म्हणजे मोहपूर या आदिवासी गावाला पेसा कायद्यांतर्गत विशेष सुविधा देण्यात आल्याचा दावा केला जातो.
पेसा कायद्यांतर्गत मोहपूर गावात एक वैदयकीय अधिकारी, एक परिचारिका, एक औषध निर्माता यांचा समावेश असलेलं आरोग्य पथक नियुक्त करण्यात आलं आहे. मात्र यातली दोन पदं रिक्त आहेत. तर आरोग्य उपकेंद्रात नियुक्त असेलल्या दोन्ही परिचरिकांकडे अतिरिक्त कार्यभार आहे. परिणामी उपकेंद्रातल्या परिचारिकांचं महिन्यातून जेमतेम दोन - चार वेळाच गावात येणं होतं. पूर्णवेळ आरोग्य अधिकारी देण्याची मागणी मोहपूर ग्रामस्थ सातत्यानं करताहेत. मात्र लहान मुलाचा बळी जाऊनही, आरोग्य विभागाला अजूनपर्यंत जाग आलेली नाही.