अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे, तिवसा-मोर्शी मार्गावरील राजूरवाडी या गावजवळील नदीला मोठा पूर आला आहे. दुपारी तीन वाजल्यापासून या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद आहे. मोर्शी आणि तिवसा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसंच दोन्ही बाजूला १००हून अधिक नागरिक अडकून पडले आहे.
पुलावरील पाणी ओसरत नसल्याने, अनेक जण जीव धोक्यात घालून पुलावरुन प्रवास करत आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, गुरुवारी अमरावती जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. मोर्शी तालुक्यातही मुसळधार पाऊस झाल्याने शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
त्याशिवाय, मोर्शी तिवसा मार्गावर असलेल्या राजूरवाडी परिसरातील एका नदीला मोठा पूर आल्याने, तसंच पुलाची उंची कमी असल्याने या पुलावरुन पाणी वाहत आहे. त्यामुळे मोर्शी आणि तिवसाकडे जाणाऱ्या लोकांना दुपारी तीन वाजल्यापासून ताटकळत थांबावं लागत आहे.
या मार्गावरील पुलाची उंची कमी असल्याने, दरवर्षी या पुलावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असतं. त्यामुळे प्रशासनाने हा पूल तात्काळ उंच-मोठा करावा अशी मागणी वारंवार केली असूनही प्रशासनाने कुठलाही यावर निर्णय घेतला नसल्याने लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. जवळपास सायंकाळ होऊन उलटली, तरी शेकडो लोक अद्यापही ताटकळत बसले आहे.