पुणे : पोलीस कोठडीत रवानगी केल्यानंतर बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी पडले. त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ब्रेन हॅमरेज झाले असल्याची माहिती समजतेय. अतिदक्षता विभागात त्यांचावर उपचार सुरु आहेत.
गुंतवणूकदारांची फसकवणूक केल्याप्रकरणी त्यांना नवी दिल्लीत पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी त्यांना न्यायालयानं ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीत असताना डीएसकेंचा तोल गेला आणि जमिनीवर कोसळले.
खुनापेक्षाही हा गुन्हा भयंकर आहे. कारण खुनात एकच व्यक्ती मरतो. पण, डीएसकेंनी केलेल्या फसवणुकीमुळे अनेक जण उद्ध्वस्त झालेत. त्यामुळे, त्यांना १० दिवसांच्या पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी न्यायलयाकडे केली होती. परंतु, न्यायालयानं डीएसकेंना २३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय.
डीएसकेंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्यांनी योजनाबद्धरितीनं आर्थिक फसवणूक केलीय. त्यांच्या सात वेगवेगळ्या कंपन्या आहेत. जवळपास ११५३ कोटी ठेवी किंवा असुरक्षित कर्ज स्वरुपात स्वीकारले आहेत. त्यांनी हा पैसा कुठे वळवला? याचा तपास करायचा आहे. यात बँकांचाही पैसा आहे. याबाबतची कागदपत्रं आम्हाला मिळालेली नाहीत. बॅंकाचे व्यवहार तपासायचे आहेत.
यात अनेक व्यक्ती सहभागी आहेत, त्याबाबतचा तपास करायचा आहे. डीएसकेंनी यापूर्वी त्यांनी तपासात सहकार्य केलेले नाही. यातील सर्व माहिती तेच सांगू शकतात कारण ते या गुन्ह्याचे मास्टरमाइंड आहेत. हा गुन्हा खुनाच्या गुन्ह्यापेक्षाही गंभीर आहे. कारण खुनात एकाचा मृत्यू होतो, इथे असंख्य लोक जिवंतपणी मरणयातना भोगत आहेत... त्याला जबाबदार फक्त डीएसके आहेत... त्यामुळे त्यांची पोलीस कोठडी हवी असल्याचा युक्तिवाद सरकारी वकीलांनी करत डीएसकेंच्या १० दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली.
तर दुसरीकडे, आमचा पोलीस कोठडीला विरोध नाही. चौकशीला सामोरं जायला तयार आहे. त्यानंतर मी गुंतवणूकदारांचे पैसे देणार आहेच. मी कुठे पळून जाणार नाही. माझा पासपोर्ट आधीच जमा केलाय. माझ्यावर असलेल्या देणीपेक्षा माझी मालमत्ता जास्त आहे, असं डीएसकेंनी कोर्टात म्हटलं.