गावरान चिकनपेक्षाही शेवगा महाग, नक्की कारण काय?

अवकाळी पाऊस, गारपीट अन् लहरी हवेचा फटका शेवग्याला (Drumsticks) बसला आहे.  

Updated: Jan 21, 2022, 10:32 PM IST
गावरान चिकनपेक्षाही शेवगा महाग, नक्की कारण काय?  title=

योगेश खरे, झी २४ तास, नाशिक | अवकाळी पाऊस, गारपीट अन् लहरी हवेचा फटका शेवग्याला (Drumsticks) बसला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात एक किलो शेंगांचा दर हा एक किलो चिकनपेक्षाही जास्त झालाय. त्यामुळे पौष्टिक भाज्या खाणाऱ्यांची पंचाईत झाली आहे. एक किलो शेंगाचा दर हा 200-300 नाही, तर थेट 500 रुपयांवर जाऊन पोहचलाय. (drumsticks vegetable rate incresed in nashik and other district due to untimely rains)

अत्यंत पौष्टिक असलेली शेवग्याची शेंग ही अनेकांच्या जेवणाचा अविभाज्य भाग. आमटी किंवा सांबाराची चव वाढवणारा सर्वांचा लाडका शेवगा बाजारातून गायब झाला आहे. अवघ्या काही महिन्यांपूर्वी २०-२५ रुपये किलोनं मिळणारा शेवगा नाशिकच्या बाजार समितीत दोनशे-अडीचशे रुपयांवर जाऊन पोहोचलाय. महानगरांमध्ये किरकोळ बाजारात तर शेवग्याचा किलोचा दर चारशे ते पाचशे रुपयांवर गेला आहे. 

नैसर्गिक आपत्तीमुळे शेवग्याचा फुलोरा वेळेपूर्वी गळून पडलाय. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. अवकाळी पावसामुळे शेंगांचा दर्जा खराब झालाय. त्यामुळे बाजार समितीमधील आवक निम्म्याहून कमी झाली आहे. 

मोरिंगा पावडरसह विविध जीवनसत्व असलेल्या शेवग्याचं सूप हे नॉनव्हेज पाया सूपच्या तोडीचं पौष्टिक समजलं जातं. व्हेजेटरियन लोक अगदी नळी खाल्ल्याच्या आवीर्भावात शेवग्याच्या शेंगांवर ताव मारतात. व्हिटॅमिनयुक्त भाज्यांकडे कल वाढलेला असताना नजिकच्या काळात शेवग्याचा दर कमी होण्याची शक्यता नसल्याचं शेतीतज्ज्ञांचं म्हणणं आहे.