पुण्यात रस्त्याने घेतला डॉ. एकता कोठावदे या तरुणीचा जीव

 एका हुशार, मेहनती डॉक्टरचा बळी....

Updated: Dec 2, 2019, 08:50 PM IST
पुण्यात रस्त्याने घेतला डॉ. एकता कोठावदे या तरुणीचा जीव title=

अरुण मेहेत्र, झी मीडिया, पुणे : पुण्यात एमडीचं शिक्षण घेत असलेल्या डॉ एकता कोठावदे या तरुणीचा गेल्या आठवड्यात अपघाती मृत्यू झाला. वरवर पाहाता हा अपघात झाला असला तरी आता या अपघाताला कोणीतरी जबाबदार आहे.

२५ नोव्हेंबरला कात्रज चौकात झालेला हा अपघात आहे. या अपघातात एका हुशार, मेहनती डॉक्टरचा बळी गेला. २६ वर्षीय डॉक्टर एकता कोठावदे मूळची जळगाव जिल्ह्यातील धरणगावची. ती पुण्यात आयुर्वेदातील पदव्युत्तर शिक्षण घेत होती. मात्र आज सारंकाही अर्धवट राहिलं आणि त्यासाठी कारणीभूत आहे कात्रज चौकातील हा धोकादायक रस्ता. आता या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आलेलं असलं तरी अपघात झाला त्यादिवशी याठिकाणी सिमेंटचे ब्लॉक बसवलेले होते. अपघताच्या वेळी याच ठिकाणी एकताची गाडी स्लिप झाली आणि मागून येणाऱ्या टेम्पोनं तिचा बळी घेतला.

हा अपघात घडल्यांनंतर पोलिसांनी टेम्पोचालकाला तात्काळ अटक केली. मात्र याठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज तसेच परिस्थितीचा आढावा घेतल्यांनंतर नवीनच माहिती उजेडात आली. इथल्या रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा झाला असल्याचं स्पष्ट होतं आहे. त्यामुळे कात्रज पोलिसांनी पुणे महापालिकेला त्याबाबतचा पत्रव्यवहार सुरु केला आहे. प्रश्न एवढाच आहे, की पुणे शहरातील रस्त्यांची परिस्तिथी बघता अशा आणखी किती एकतांचे बळी इथला संवेदनाशून्य प्रशासन घेणार आहे ?