जालना: डॉ. दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी जालन्यातील एकाला एटीएसनं अटक केलीय. श्रीकांत पांगारकर असं या व्यक्तीचं नाव आहे. पांगारकर हा जालना नगर परिषदेचा माजी नगरसेवक आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो औरंगाबादमध्ये राहत असल्याची माहिती आहे. पांगारकरच्या जालन्यातील घराची झाडाझडती घेतल्याची माहितीही समोर आलीय.
दरम्यान, दाभोलकर हत्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतलेला सचिन अंदुरे असं करू शकत नाही, असा विश्वास तो काम करत असलेल्या दुकानाचे मालक आणि कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलाय. सचिन निराला बाजार येथील दुकानात गेल्या दहा वर्षांपासून काम करत होता. तो नियमित आपल्या एकनिष्ठेने काम करत होता असा विश्वासही दुकान मालक दिलीपकुमार साबु यांनी व्यक्त केला तर सचिनच्या अटकेने धक्का बसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितलं.
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (२०, ऑगस्ट) ५ वर्षे पूर्ण होतायत. त्यांच्या स्मृतिदिनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने 'जवाब दो' आंदोलनाचं आयोजन करण्यात आलंय. या आंदोलनाची सुरवात सकाळी ७.१५ ला विठ्ठल रामजी शिंदे पुलावर दाभोलकऱ़ यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. विठ्ठल रामजी शिंदे पूल ते ते साने गुरुजी स्मारक दरम्यान निषेध मोर्चा काढण्यात़ येणार आहे. या आंदोलनात समाजवादी नेते बाबा आढाव, हमीद दाभोलकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मेधा पानसरे यांच्यासह अंनिसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित आहेत.