लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेचे दुसऱ्यासोबत जुळलं अन्... डोंबिवलीतील हादरवणारी घटना

Dombivli Crime : लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या महिलेने दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध जुळताच पहिल्या प्रियकराला संपवल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीमध्ये घडला आहे. मानपाडा पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

आकाश नेटके | Updated: Apr 24, 2023, 05:14 PM IST
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेचे दुसऱ्यासोबत जुळलं अन्... डोंबिवलीतील हादरवणारी घटना title=

अतिश भोईर, झी मीडिया, डोंबिवली : सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या डोंबिवली (Dombivli News) शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये (Dombivli Crime) वाढ होताना दिसत आहेत. डोंबिवलीच्या कोळेगाव परिसरात महिलेने मित्राच्या मदतीने प्रियकराची निर्घृण हत्या केली आहे. या प्रकरणी डोंबिवली मानपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे. दरम्यान, आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली जात आहे.

डोंबिवलीच्या कोळेगाव परिसरातील एका चाळीत हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. मारुती हांडे नावाच्या व्यक्तीची त्याच्यी प्रेयसी संध्या सिंह हिने तिच्या नव्या प्रियकरासोबत मिळून हत्या केली आहे. मारुती हांडे आणि संध्या सिंह हे लिव्ह इन रिलेशशिपमध्ये राहत होते. गेल्या तीन ते चार वर्षांपासून मारुती हांडेचे संध्या सिंहसोबत प्रेमसंबध होते. यादरम्यान संध्याची त्याच चाळीत राहणाऱ्या वेदांत शेट्टी उर्फ गुड्डूशी ओळख झाली.  गेल्या वर्षभरापासून संध्या आणि गुड्डूमध्ये प्रेम प्रकरण सुरु होतं. मारुतीला याची माहिती मिळाली आणि त्यानंतर दोघांमध्ये सातत्याने वाद होऊ लागले.

रविवारी देखील मारुती आणि संध्याचा याच कारणावरुन वाद सुरु होता. त्यावेळी गुड्डू घरात आला. त्यानंतर वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. संतापाच्या भरात गुड्डू आणि संध्याने मारुतीला बॅटने बेदम मारहाण केली. या मारहाणीतच मारुतीचा मृत्यू झाला. तितक्यात गुड्डूने तिथून पळ काढला. त्यानंतर संध्याने शेजारच्यांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. मारुती घरात पडूनच जखमी झाला असा बनाव संध्याने केला होता. रुग्णालयात डॉक्टरांनी मारुतीला मृत घोषित केल्यानंतर संध्या घरी आली होती. मात्र पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी आधी संध्याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत संध्याने सारी हकीकत सांगितली. यानंतर पोलिसांनी गुड्डूलाही ताब्यात घेतले.

पोलिसांनी काय सांगितले?

"बालाजी दर्शन येथील कोळेगाव येथील मारुती हांडे या व्यक्तीला वेदांत शेट्टी आणि संध्या सिंग यांनी डोक्यात बॅट घालून जबर जखमी केल्यानंतर रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर मारुती हांडे याचा मृत्यू झाला. मारुती हांडे याचे संध्या सिंगसोबत तीन ते चार वर्षांपासून शारिरीक संबंध होते. ते दोघेही चाळीत राहत होते. पण त्याच चाळीत राहणाऱ्या वेदांत शेट्टी याचे संध्या सिंगसोबत गेल्या वर्षभरापासून प्रेमसंबध होते. त्यानंतर दोघांनी मारुती हांडे याला मारहाण केली. ताबडतोब पोलिसांची तीन पथके तयार करुन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडे चौकशी सुरु असून त्यातून आणखी माहिती समोर येणार आहे," अशी माहिती सहाय्यक पोलीस उपायुक्त सुनील कुराडे यांनी दिली.